द्राक्ष बाग आठवडी नियोजन

द्राक्ष

बागेमध्ये दोन ओळींमध्ये उपलब्ध असलेल्या जागेत कधीही न चाललेली मुळे यावेळी जसजसे वातावरण कोरडे होते, तशी कार्य करण्यास सुरुवात करेल. त्यामुळेच या भागात उपलब्ध असलेली किंवा बोदामधून वाहून येथे आलेली अन्नद्रव्ये ही मुळे उचलून वेलीला पुरवतील. परिणामी वेलीचा जोम वाढतो. अशा परिस्थितीमध्ये वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी नत्र आणि नत्रयुक्त खतांचा वापर पूर्णपणे टाळणे गरजेचे असेल. भारी जमिनीमध्ये नत्राचा वापर पूर्ण बंद केला तरी वाढ तितक्याच प्रमाणात सुरू असताना दिसेल. जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा व त्यासोबतच उपलब्ध अन्नद्रव्ये याकरिता करणीभूत असतील. अशा परिस्थितीमध्ये पाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल, त्यासोबत पालाशची उपलब्धता फवारणी व ठिबकद्वारे करता येईल. बोद मोकळे झाले किंवा जमीन वाफश्यात आल्याची खात्री झाल्यास जमिनीतून शिफारस केलेल्या खतांच्या तुलनेमध्ये २० ते २५ टक्के जास्त प्रमाणात पालाश किंवा स्फुरद व पालाशयुक्त खते द्यावीत. कारण यावेळी कार्यक्षम अशी पांढरी मुळे वेलीच्या कक्षेत किंवा त्याच्या आजूबाजूस उपलब्ध असतील. जमिनीची परिस्थिती पाहून खताची मात्रा कमी अधिक करता येईल. हलकी जमीन असल्यास एकाच वेळी जास्त खते देऊ नयेत. त्याऐवजी खते दोन ते तीनवेळा विभागून द्यावीत. बागेत वाफसा स्थिती आलेली असल्यास मात्र ठिबकद्वारे जमिनीतून उपलब्धता करणे सोपे होईल.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post