द्राक्ष बाग सल्ला | माती व पाणी परीक्षण |

द्राक्ष

🧪 माती व पाणी परीक्षण 

बऱ्याच बागेतील जमिनीत चुनखडी तीन ते पंचवीस टक्क्यांपर्यंत आणि सोडिअम क्षारसुद्धा अधिक असल्याचे आढळून येते. पाण्यामध्ये सोडिअम क्षाराचे प्रमाणही अधिक आढळते. आपण अनेकदा या बाबींकडे दुर्लक्ष करतो. मणी सेटिंग झाल्यानंतर आपण बऱ्याच प्रकारची महागडी खते जमिनीत देत राहतो. मात्र ती मुळांद्वारे उचलली जात नाहीत. परिणामी, मण्यांचा आकार कमी-अधिक राहतो आणि घडाचे अपेक्षित वजन मिळत नाही. शेवटी निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्ष उत्पादनात अडचणी येतात. या गोष्टी टाळण्याकरिता फळछाटणीचा हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधी माती व पाणी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. मातीचा नमुना घेतेवेळी बागेतील ठिबकचे पाणी जिथे पडते, त्यापासून १५ सें.मी. पुढील भागात ४ ते ६ इंच खोलीवरून मातीचा नमुना घ्यावा. बागेमध्ये एकसारखी जमीन दिसत असल्यास एक एकर क्षेत्रातून चार ते पाच ठिकाणांहून माती गोळा करावी. ती एकत्र केल्यानंतर चार भागात विभागून, त्यातील दोन भाग वेगळे काढावेत. असे तीन-चारवेळा करत शेवटी मातीचा नमुना अर्धा किलोपर्यंत राहील, अशा प्रकारे माती गोळा करून प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी नमुना पाठवावा. 

पाण्याचा नमुना घेतेवेळी विहिरीचे पाणी असल्यास अर्धा लिटर पाणी प्लॅस्टिक बाटलीमध्ये गोळा करावे. पंपाद्वारे पाणी घेत असल्यास पंप सुरू केल्यानंतर सुरुवातीची १० मिनिटे पाणी सोडून दिल्यानंतर पाणी नमुना घ्यावा.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post