कापूस पिक |कपाशीतील मित्र कीटकांचे संवर्धन|

 कापूस

कपाशीतील मित्र कीटकांचे संवर्धन 


🐞 मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी शक्यतोवर पेरणीनंतर दोन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. या काळात मित्र कीटक कापसाच्या शेतामध्ये बहुसंख्येने स्थिर होतील. परभक्षक कीटक ढालकिडा, हरित पंखी क्रायसोपा, कोळी आणि परोपजीवी कीटक ॲनासियस, ॲनागायरस, मावा परजीवी गांधीलमाशी हे कपाशीमधील तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषक किडींची संख्या मर्यादित राखण्यास मदत करतात. 

🐞 नीम तेल, एरंडी तेल, मासोळी तेलयुक्त वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा (उदा. लिकॅनीसिलियम लिकॅनी) वापर करावा. 

🐞 कमी विषारी असणाऱ्या कीटक वाढ नियंत्रके, कीटकनाशके (उदा. बुप्रोफेजीन, स्पायरोमेसिफेन, डायफेन्थूरॉन, फ्लोनिकॅमिड) यांचा पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करावा. 

🐞 कमी नुकसानकारक दुय्यम पतंग किडी (उदा. पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी) यासाठी रासायनिक फवारणी शक्यतो टाळावी. या अळ्या कपाशीच्या झाडाला फारच कमी इजा पोचवतात, त्यामुळे परोपजीवी कीटकांना (उदा. ट्रायकोग्रामा, ॲपेन्टॅलीस आणि सिसिरिपा) इजा पोचणार नाही. हे कीटक अमेरिकन बोंड अळीच्या नैसर्गिक नियंत्रणाचे काम करतात. 

🐞 जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने पर्यावरणासाठी अति विषारी (वर्ग १) कीटकनाशकांचा वापर टाळावा. ही कीटकनाशके पर्यावरणाच्या व मित्र कीटकांच्या दृष्टीने हानिकारक ठरतात. 

🐞 कीटकनाशकांच्या मिश्रणाचा वापर टाळावा. मिश्रणाचा वापर पर्यावरणास अनुकूल नाही.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post