पूर्वहंगामी ऊस
कीड नियंत्रण
⭕️ कांडी कीड- कांडी तयार झाल्यापासून ते ऊस तोडणीपर्यंत प्रादुर्भाव आढळतो. उसाला कांडी लागताच कांडी किडीचा उपद्रव सुरू होतो. किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. जास्त तापमान, कमी आर्द्रता व कमी पाऊस या बाबी किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतात. प्रादुर्भावग्रस्त उसाची वाढ कमी होऊन कांड्या लहान राहतात. किडीची अळी एका उसाच्या २ ते ३ कांड्यांना छिद्र पाडून आतील बाजूस नुकसान करते. कांड्या आखूड आणि बारीक राहतात. उसास पांगशा फुटतात, पाचट काढले असता त्यात किडीची विष्ठा व भुसा आढळतो. बऱ्याचवेळा त्यात किडीची अळी दिसून येते.
🛡️ व्यवस्थापन
→लागवडीसाठी निरोगी आणि कीडविरहित बेण्याची निवड करावी.
→नत्रयुक्त रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
→ उसाचे पीक सुरुवातीला ५ महिन्यांपर्यंत तणमुक्त ठेवावे. पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
→ जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतात ५, ७ व ९ महिन्यांनी जमिनीलगत खालची २-३ पाने काढून किडीच्या अंड्यासह नष्ट करावीत.
→ पाणथळ ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करावा.
→ लागवडीनंतर ४ महिन्यांनंतर १५ दिवसांच्या अंतराने एकरी २ ट्रायकोकार्डस वापरावीत.
→ ऊस पीक ४ ते ५ महिन्यांचे असताना आणि नुकसान पातळी १५ टक्के दिसताच, एकरी २ फेरोमोन ट्रॅप्स (ईएसबी/ आयएनबी ल्यूर) वाढ्याच्या उंचीवर लावावीत. दर १५ दिवसांनी ल्यूर बदलावे.
→ प्रति एकरी क्विनॉलफॉस (५ जीआर) दाणेदार १२ किलो किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) दाणेदार ७.५ किलो याप्रमाणे जमिनीत मिसळावे.