आले
लागवड पद्धती
⭐️ सपाट वाफे पद्धत: पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत माती आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
⭐️ सरी-वरंबा पद्धत: मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
⭐️ रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत: काळी जमीन, त���ेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने १५-२० टक्के अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादीवाफ्याची लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावायच्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५०-६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवून, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि कंदांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आले लावावे आणि लगेच पाणी द्यावे.