आंबा
आंबा फळांचे संभाव्य पावसापासून संरक्षण करण्यासाठी अंड्याच्या आकाराच्या फळांना २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. त्यामुळे फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे मिळतात. तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून आणि फळमाशीपासून संरक्षण होण्यास मदत होते. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. बागेमधील गळालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी रक्षक फळमाशी सापळे एकरी २ या प्रमाणात लावावेत. हे सापळे बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहतील, अशा प्रकारे टांगावेत.