संत्रा-मोसंबी-लिंबू
विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश फळबागा या विहिरी, कूपनलिका यांवर आधारित आहेत. दरवर्षीच्या उपसा आणि दोन-तीन वर्षांतून येणारी दुष्काळसदृश्य स्थिती यामुळे भूजल पातळी कमालीची खोल जाते. याचा फटका लिंबूवर्गीय फळबागांना बसतो. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
👉 बागेमध्ये दोन झाडाच्या ओळींमध्ये सलग नाल्या काढाव्यात. यामुळे जमिनीची धूप २८-३० टक्के रोखली जाते. वाहून जाणारे पाणी ३२-३५ टक्के जमिनीत मुरवले जाऊ शकते.
👉 संत्रा, मोसंबी व कागदी लिंबाच्या लहान बागांमध्ये काळ्या पॉलिथिन कापडाचे आच्छादन (१०० मायक्रॉन) टाकावे. यामुळे १५ टक्के पाण्याची बचत होते. झाडांची वाढ जोमदार होते. वरील प्रकारे ३.२ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याचे संवर्धन आणि काळ्या पॉलिथिन आच्छादनाद्वारे पाणी बचतीची उपाययोजना केल्यास, ठिबक सिंचन संचाद्वारे पाण्याचा वापर केल्यास २८८ संत्रा झाडांचे व्यवस्थित संगोपन करता येते.
👉 जमिनीच्या उतारावरील नैसर्गिक नाल्यांना आडवा बांध बांधल्यास सिंचनासाठी पाणी साठवले जाते. सोबतच भूगर्भातील जलपातळी १ ते २.५ मीटरने वाढण्यास मदत होते.