खोडवा ऊस
ऊसतोडणीवेळी पाचट ओळीत न लावता जागीच ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे, ऊसाचे बुडखे मोकळे करावेत. यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतात. बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो, फुटव्यांची संख्या वाढते, जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास, जमिनीच्यावरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात, त्यांचे क्वचितच उसात रुपांतर होते. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी ३२ किलो युरिया व ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन सेंद्रिय खत किंवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. पाचट कुजण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणार्या जिवाणूंची गरज असते. खोडवा ऊसाला पाणी द्यावे. पाचटामुळे सुरुवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो. तरी सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीने लक्ष द्यावे. पाचट जास्त असल्यास जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा जनावरांच्या पायाने दाबून घ्यावे. पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. ऊसतोडणी यंत्राच्या सहाय्याने केली असल्यास, बुडख्यावरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणे ही कामे करण्याची गरज नाही.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.