कापूस
प्रत्येक वेचणीनंतर कापूस शेतात सावलीत वाळवून नंतरच साठवावा. कापसाच्या साठवणीसाठी फरशी अथवा सिमेंटची सपाट जागा अथवा ताडपत्रीसारखे कापड असावे. साठवण करताना ती दाबून घट्ट करू नये. त्यामुळे कापसाची फुललेली नैसर्गिक स्थिती बिघडते. धुरकट किंवा धुळीच्या जागेपासून कापूस दूर साठवावा. कापूस ढिगाऱ्यावर उड्या मारू नये किंवा झोपू नये. स्वयंपाकाच्या खोलीच्या बाजूला कापूस साठवू नये. धुरामुळे कापूस पिवळा पडतो, काहीवेळा आग लागण्याची शक्यता असते. कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतो वेगळा साठवावा. कापसाच्या वेचणीनंतर कापूस उन्हात सुकवून नंतरच साठवावा. वेचणीच्या काळात पाऊस आल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावरच सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा. शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला ‘झोडा’ असे संबोधले जाते. अशा कापसाची रुई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून हा कापूस वेगळा साठवावा. कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कापूस मोकळी हवा असणाऱ्या पक्क्या गोदामात जातीनिहाय साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसाला पिवळसरपणा येतो. त्यामुळे रुई व धाग्याची प्रत खालावते. निरनिराळ्या वाणांची साठवण वेगवेगळ्या ठिकाणी करावी. जेणेकरून त्यांची भेसळ होणार नाही. ज्या कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्या झाडावर चिकट पदार्थांचे प्रमाण वाढते. परिणामी रुईची प्रत खालावते. अशाप्रकारच्या रुईला मागणी नसते. त्यामुळे अशा कापसाचीसुद्धा वेगळी साठवण करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.