कापूस
कापसाला मिळणारा बाजारभाव हा पूर्णपणे कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. कापसाची प्रतवारी सदृश्य पद्धतीने केली जाते. सर्वसाधारणपणे कपाशीची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असते. त्यामुळे संकलन केंद्रावर प्रतवारी, मोजमाप व प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणून केवळ सदृश्य पद्धतीनेच प्रतवारीचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येते. बहुतांशी शेतकरी कापसाची वेचणी करताना योग्य काळजी घेत नसल्याने कापसामध्ये २० ते ३० टक्के कचरा व पालापाचोळा रुईमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच, त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकविण्यास अडचण निर्माण होते. कापूस उत्पादनासोबत स्वच्छ, काडीकचरा विरहीत कापूस काढण्यावर भर दिल्यास आणि कापड उद्योगाला लागणाऱ्या दर्जाचा कापूस उत्पादित केल्यास जास्तीचा दर मिळून अधिक आर्थिक लाभ मिळवता येतो. कापूस वाण निश्चित केल्यानंतर त्याची प्रत ठरविणे आवश्यक आहे. प्रत ठरविताना कापसाचा रंग, स्वच्छता, रुईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इत्यादीचे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारात घेतले जाते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.