हरभरा
बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरवावे, म्हणजे एकरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता २६ ते २८ किलो; तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्या दाण्यांच्या वाणाकरीता ४० किलो प्रति एकर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी.के.व्ही. ४ या जास्त टपोर्या काबुली वाणांकरीता ५०-५२ किलो प्रति एकरी बियाणे वापरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी.
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेंडाझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर प्रति १० किलो बियाण्यास रायझोबिअम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्याच्या मुळांवरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.