हळद पिकातील पाणी व्यवस्थापन

 हळद     
पाणी व्यवस्थापन 

पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यास, मुळांना ऑक्सीजन घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून मलूल झालेली दिसतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा. ऑगस्ट, सप्टेंबर हा हमखास पावसाचा कालावधी असल्याने वाकोर्‍याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. 

पावसाच्या कालावधीत जमिनीतील ओलावा तपासून पाणी देण्याचे नियोजन करावे. हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. पाऊस समाधानकारक असेल तर हलक्‍या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळया द्याव्या लागतात. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर हळदीच्या कंदांची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर  हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते. 

रुंद वरंबा सरी (गादी वाफा) पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचन���चा वापर फायदेशीर ठरतो. ठिबकच्या दोन लॅटरमधील अंतर ४-५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. ठिबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन शोषण अधिक होते. तसेच कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post