पशु संवर्धन चारा नियोजन तसेच शेळी पालन चारा व्यवस्थापन.

 पशु संवर्धन :- 


हायड्रोपोनिक्स चारा मका, सातू, गहू व बाजरी यांच्यापासून हायड्रोपोनिक्स चारा तयार करता येतो. मोड आलेले धान्य ट्रेमध्ये पसरवून, त्यावर वेळोवेळी पाण्याचा फवारा मारून हायड्रोपोनिक्स चारा दहा दिवसांत तयार करता येतो. असा चारा प्रति जनावर दहा किलोपर्यंत वापरावा. यात सहज पचणाऱ्या घटकांचे व पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आहारात इतर वाळलेल्या चाऱ्याचा समावेश असावा, जेणेकरून पचन योग्यरीतीने होईल. यात फुटलेले दाणे वापरू नयेत, त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच ज्वारीचा वापर करू नये, कारण ज्वारीच्या कोवळ्या अंकुरात हायड्रोसायनिक अॅसिड असते, जे जनावरांना अपायकारक असते. पारंपरिक पद्धतीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली ऊर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळांच्या वाढीसाठी वापरली जाते. परंतु हायड्रोपोनिक्समध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.


शेळी पालन
शेळीपालनामध्ये चारा व खाद्यावर ६० ते ७० टक्के खर्च होतो. हा खर्च कमी करता आल्यास, उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित वैरण प्रजातींच्या एकदल व द्विदल प्रकारातील चारा पिकांची लागवड करावी. झाडपाल्याचा चारा म्हणून वापर केल्यास हिरव्या वैरणीचा ४० टक्के खर्च आपण कमी करू शकतो. चाऱ्यासाठी उपयुक्त असलेल्या चारा वृक्षाच्या प्रजातीची लागवड ही निश्चितच फायदेशीर ठरू शकते. यामध्ये केंद्रीय रेशीम जननद्रव्य संशोधन केंद्र, होसूर, तामिळनाडू या संस्थेमार्फत तुतीच्या विकसित केलेल्या व्ही-१, एस-१६३५, एस-१३ या सुधारित प्रजाती शेळ्यांच्या चाऱ्याकरिता उपयुक्त व फायदेशीर आहेत. तसेच तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीकेएम-१ आणि पीकेएम-२ या शेवग्याच्या प्रजाती चाऱ्याकरिता उपयुक्त असून अशा प्रजातींच्या वृक्षापासून शेळ्यांना सकस असा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post