कांदा बियाणांची काढणी व वेल वर्गीय पिकांतील केवडा रोग नियंत्रण.

 कांदा


सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी. सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. ते जसजसे तयार होतील, तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे तीन ते चारवेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून पाच ते सहा दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पोचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे. मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.


वेल वर्गीय पिके
रोग नियंत्रण केवडा (डाऊनी मिल्ड्यू) - सुरवातीला पानाच्या वरच्या वाजूला फिक्कट हिरवट पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ वातावरणात या ठिपक्यांच्या खालील बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी होतात. विशेषतः पूर्ण वाढ झालेल्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तीव्र प्रादुर्भावामध्ये पानाचे देठ, बाळ्या, फांद्यावरही आढळतो. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात. रोगग्रस्त वेलींना फुले-फळे कमी प्रमाणात व लहान आकाराची लागतात. त्यांचा दर्जा कमी आणि बेचव असतो. वेली लवकर सुकतात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते.

व्यवस्थापन

  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी. 
  • योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी. 
  • रोगप्रतिकारक जातींचा उपयोग करावा. 
  • मेटॅलॅक्झिल (३५ डब्ल्यूएस) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 
  • पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी. खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश यांमुळे रोगाचे प्रमाण कमी राहते. 
  • प्रतिबंधक उपाय म्हणून, उगवण झाल्यानंतर वीस दिवसांपासून दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) किंवा मॅंकोझेब (७५ डब्ल्यूपी) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. 
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्झिल एम + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक)) २.५ ग्रॅम किंवा अॅझोक्झिस्ट्रॉबीन (२३ एससी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार दहा दिवसांच्या अंतराने घ्यावी.
    कृषिक अप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
Post a Comment (0)
Previous Post Next Post