आडसाली ऊस
- आडसाली उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उसाच्या पानावर तांबेरा हा रोग ‘पुक्सिनिया मिल्यानोसेफिला’ किंवा ‘पुक्सिनिया कुहिनीय’ या रोगकारक बुरशींमुळे होतो. सुरुवातीस बुरशीचा प्रादुर्भाव पानांच्या दोन्ही बाजूंना होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके लालसर तपकिरी होतात. ठिपक्यांभोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार होते. पानांच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात. असे ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. हवेद्वारे हे बिजाणू विखुरले जाऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो. रोगग्रस्त ठिपक्यांतील पेशी मरून पाने करपतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळे येऊन उत्पादन घटते. साखर निर्मितीवरसुद्धा परिणाम होतो.
व्यवस्थापन - ऊस पिकाचे सर्वेक्षण करून रोगाची लक्षणे, तीव्रता व पिकाची अवस्था पाहून उपाययोजना कराव्यात.
- शिफारशीत बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- निरोगी बेणेमळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
- रोगप्रतिकारक्षम जातीची (को ८६०३२) लागवड करावी.
- योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत ऊस लागवड करावी.
- लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास उसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
- नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रण जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर, मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टीकर १ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीनवेळा फवारणी करावी. - पूर्वहंगामी ऊस खत व्यवस्थापन,आडसाली ऊस पाणी नियोजन,खोडवा ऊस पूर्वनियोजन.
- खोडवा ऊस
खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यात (प्रत्येकी ६०:२८:२८ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकरी) द्यावी. पहिली खतमात्रा खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांचे आत पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सें.मी. अंतरावर, १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते देण्याचे फायदे - खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.
- दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे खतांचा ऱ्हास फारच कमी प्रमाणात होतो.
- खत मातीने झाकल्यामुळे वाहून जात नाही.
- खत तणास न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. त्यामुळे खुरपणी खर्चात बचत होते. जास्तीत जास्त खत मुख्य पिकास उपयोगी पडते.
- रासायनिक खतांची उपलब्धता पिकांच्या गरजेनुसार हळूहळू होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची वाढ जोमदार होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते.
- सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारखे पीक येते. उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.
