कांदा-लसूण
रांगडा कांदा पुनर्लागवड शेताची नांगरणी करून, कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभूशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन गांडूळखत/ कोंबडी खत मिसळून घ्यावे. गादीवाफे १५ सें.मी. उंच आणि १२० सें.मी. रुंदीचे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. अंतर ठेवावे. रुंद गादीवाफा पद्धती तुषार किंवा ठिबकसिंचनाकरिता सोयीची ठरते. ठिबकसिंचनासाठी, प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असलेल्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. ड्रिपरची क्षमता ताशी ४ लिटर व दोन ड्रिपरमधील अंतर ३०-५० सें.मी. असावे. तुषारसिंचनासाठी, २० मि.मी. व्यासाच्या लॅटरलमध्ये ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर पाणी फेकणारे नोझल असावे. ठिबक किंवा तुषारसिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडीअगोदर सुरू करावा. सरासरी ४ सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील, इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून त्यानंतर पाणी द्यावे. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेऊन ४५ दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या शेंड्यांकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मिलि व कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. तणनियंत्रणासाठी, पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीवेळी ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) २ मिलि किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ४ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे जमिनीवर फवारणी करावी.
हरभरा लागवड पद्धती आणि गहू लागवड सल्ला.
वेल वर्गीय पिके
कोरड्या आणि उष्ण हवामानात लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीमुळे झाडाची पाने पिवळसर, मलूल व निस्तेज होतात. हिरव्या पानांवर टाचणीच्या टोकाएवढे पिवळसर पांढुरके ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकमेकांत मिसळतात. अशी पाने नंतर पिवळसर दिसतात. पिवळ्या पानांचे निरीक्षण केल्यास खालील बाजूस लाल कोळीचे सूक्ष्म जाळे दिसते. अधिक प्रादुर्भावाच्या परिस्थितीत सर्व पाने पिवळी पडून, आकसून गळतात. नियंत्रणासाठी, अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) २ मिलि किंवा प्रोपारगाईट (५७ ईसी) १ मिलि किंवा स्पायरोमेसीफेन (२२.९ एससी) १.२ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.