शेळी पालन :-
मावा शेळी-मेंढीमधील मावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. एका शेळी-मेंढीपासून दुसऱ्यांना संसर्ग होतो. हा आजार सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होऊ शकतो. लहान वयाच्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी शेळ्या-मेंढ्या अशक्त होतात. औषधोपचावर जास्त खर्च होतो. उत्पादनक्षमता कमी होते. काहीवेळा कासदाह होऊन दूध कमी होते. त्यामुळे पिल्लांची जोपासना व्यवस्थित होत नाही. पिल्लांच्या वाढीचा दर कमी होऊन बाजारात योग्य किंमत मिळत नाही. काही शेळ्या-मेंढ्यांमध्ये कायमस्वरूपी व्यंधत्व येते.
उपचार – हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे यावर कोणत्याही प्रतिजैविकाचा वापर होत नाही. यावर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुवून साफ कराव्यात. तोंड व ओठांवरील जखमांवर हळद व लोणी किंवा दुधाची साय यांसारखे मऊ पदार्थ लावावेत, जेणेकरून जखमा लवकर बऱ्या होतील. बोरोग्लिसरीन सारखे औषध लावावे. खाद्यामध्ये मऊ, लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथीघास द्यावे. अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळपाणी यांसारखे पौष्टिक पदार्थ द्यावेत.