कापूस
कपाशीची पाने लाल होणे ज्याला शेतकरी ‘लाल्या रोग’ असे म्हणतात; हा बुरशी, जीवाणू किंवा विषाणू यांमुळे होणारा रोग नसून ही शरीरक्रियात्मक विकृती आहे. या विकृतीमुळे पानांच्या कडा लाल होण्यास सुरुवात होते, हळूहळू संपूर्ण पान तांबूस दिसते. लाल झालेली पाने वाळतात व गळून पडतात.
व्यवस्थापन
- पिकांची फेरपालट करावी.
- संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार रासायनिक खतांसोबतच शेणखत किंवा कंपोस्ट खत, हिरवळीची खते, जीवाणू खते यांचा वापर केल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तसेच जलधारणशक्ती व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
- नत्राच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. नत्रयुक्त खतांच्या मात्रा विभागून द्याव्यात. युरिया किंवा डीएपी या नत्रयुक्त खतांची २ टक्के या प्रमाणात पाते व बोंडे लागताना फवारणी करावी.
- पेरणीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार रासायनिक खतमात्रा द्यावी. जमिनीमधून मॅग्नेशिअम सल्फेट ८ किलो प्रतिएकरी द्यावे.
- फुले लागणे व बोंडे पक्व होताना मॅग्नेशिअम सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
- रसशोषक किडी व रोगांच्या व्यवस्थापनासाठी वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात.
- जमिनीत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
- पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पावसाची उघडीप वा खंड असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन द्यावे.
हे पण वाचा हळद कंदकूज,करपा व आले पानांवरील ठिपके, कंदकूज रोग नियंत्रण.
- सोयाबीन
वातावरणात अधिक आर्द्रता असल्यास सोयाबीन कापणी टाळावी. कापणी झाली असल्यास गंज ताडपत्रीने व्यवस्थितपणे झाकावी. दुपारच्या वेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास ताडपत्री काढून गंजीला सुकू द्यावे, जेणेकरून दाणे सुकणार नाहीत. सुकलेल्या गंजीची मळणी करताना मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३५० ते ४०० आरपीएम असावी, जेणेकरून बियाण्यास इजा पोहोचणार नाही व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होणार नाही. मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३ ते १५ टक्के असावे. तयार झालेले बियाणे ओलसर असल्यास सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आल्यास वाळविणे थांबवावे. बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यास बियाणे अधिक तापमानात वाळवू नये, अन्यथा उगवणक्षमता झपाट्याने कमी होते. बियाण्यात अधिक ओलावा असेल, तर बियाणे उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर जागी वाळवावे. बियाणे उन्हात वाळवितेवेळी पक्क्या फरशीवर न वाळविता पातळ ताडपत्रीवर वाळवावे. बियाणे चांगल्यारीतीने स्वच्छ करावे.