हळद
रोग नियंत्रण
कंदकूज - पिथियम, फायटोप्थोरा, फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशींमुळे कंदकूज होते. प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होते. कंदकूज प्रतिबंधासाठी, जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस २-२.५ किलो प्रतिएकरी २५०-३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर, कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.करपा - सकाळी पडणारे धुके व दव रोगप्रसारास अनुकूल असते. कॉलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. टॅफ्रिना या बुरशीमुळे लहान तांबूस रंगाचे असंख्य गोलाकार ठिपके पानावर आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनात मोठी घट येते. नियंत्रणासाठी मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन १५ दिवसांच्या अंतराने सात महिने पूर्ण होईपर्यंत आलटून-पालटून फवारण्या कराव्यात.
हे पण वाचा:आले व हळद पिकातील खत व्यवस्थापन.
आले
रोग नियंत्रण
कंदकूज - प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजॅरियम यांसारख्या रोगकारक बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरवात होते. कंदकूज प्रतिबंधासाठी, जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस २ ते २.५ किलो प्रतिएकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर, कॉपर ऑक्सिक्लोराइड ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.
पानांवरील ठिपके - ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वर राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात. नियंत्रणासाठी, मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५-२० दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.