भात
गरवा भात खाचरात पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत आणि निमगरवा भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. नियंत्रित करावी. तसेच हळवे भात परिपक्व अवस्थेत असल्यास कापणीपूर्वी ८ ते १० दिवस खाचरातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. पूर्ण पक्व झालेल्या हळव्या भाताची रोपे हिरवी असतानाच सकाळच्या वेळेस वैभव विळ्याने जमिनीलगत कापणी करावी. कापणी केलेले भात पिकाची लगेच मळणी करावी. धान्य कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. तयार भातपिकाची कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे चांगले दाणे शेतात पडतात. भात कांडपावेळी कणीचे प्रमाण वाढते. पिकाची कापणी जमिनीलगत करावी. कापणीनंतर शेताची नांगरट करून धसकटे काढून नष्ट करावीत. यामुळे पुढील हंगामात खोडकीड आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. सध्या सकाळच्या वेळेस जास्त आर्द्रता दिसून येत आहे. दुधाळ अवस्थेत असलेल्या निमगरव्या आणि गरव्या भात पिकावर लोंबीवरील ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुधाळ अवस्थेतील पिकांवर प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिल्ले दाण्याला छिद्र पाडून आतील रस शोषून घेतात. परिणामी दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते. छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठिपका तयार होतो. किडीच्या नियंत्रणासाठी बांधावरील गवत कापून बांध स्वच्छ ठेवावेत. पिकावर लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.५ मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ इसी) ०.९ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
सोयाबीन अळी,चक्री भुंगा,खोड माशी नियंत्रण तसेच मका पिक व्यवस्थापन.
मका
कणसावरील आवरण बाजूला करून, त्यातील मक्याचे दाणे वेगळे करणे हे एक कष्टप्रद काम आहे. हे काम बहुतांश ठिकाणी महिलांकडे असते. पूर्वी हे काम हाताने केले जात असे. त्यासाठी हाताच्या साह्याने चालवण्याची छोटी यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे महिलांवरील या कामाचा भार थोडासा हलका झाला असला, तरी त्यासाठी अधिक ताकद लागत असल्याने कमी प्रमाणात मक्याचे दाणे वेगळे करता येत होते. त्यातही कणसावरील आवरण काढण्याचे काम हातानेच करावे लागत असे. मात्र महिलांसाठी कृषी संशोधन संचालनालय, भुवनेश्वर यांनी पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मका कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र दोन व्यक्तींच्या साह्याने चालवता येते. त्यामध्ये एकामागोमाग एक अशी मक्याची कणसे आत टाकावी लागतात. पुरुष या यंत्रावर काम करत असताना, या यंत्राच्या क्रॅंकशाफ्टचा वेग ५७ आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे ८९.६ किलो/तास दाणे मक्याच्या कणसापासून मिळतात. स्त्रिया या यंत्रावर काम करत असताना क्रॅंकशाफ्टचा वेग ५२ आरपीएम ठेवला जातो. त्यामुळे महिलांनाही हे काम करताना ताण येत नाही. सहजतेने काम करता येते. या वेगाने काम केल्यास ६३.४ किलो दाणे/तास वेगळे करता येतात. या यंत्रामुळे हाताच्या साह्याने कणीस सोलणे, दाणे वेगळे करण्यापेक्षा ४८.९ टक्के वेळ कमी लागतो. नळीच्या आकाराच्या मका सोलणी यंत्रापेक्षा ३८.७ टक्के वेळ कमी लागतो. हे उपकरण ३७० किंवा ७४० वॉट सिंगल फेज इलेक्ट्रिक मोटरवर चालते.