खरीप कांदा पिक रोग व किडी नियोजन तसेच टोमॅटो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.


 कांदा-लसूण


खरीप कांद्याच्या उभ्या पिकाकरिता - सतत पाऊस पडत राहिल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्यरितीने निचरा करावा. पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरियाची १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि., १५ दिवसांच्या अंतराने, ट्रायसायक्लाझोल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि., त्यानंतर १०-१५ दिवसांच्या अंतराने, हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि. अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १००-११० दिवसांनी करावी. कांदा काढणीआधी १० दिवस पाणी देणे बंद करावे. खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. अशावेळी काढणीच्या २ ते ३ दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडून घ्याव्यात. शेत कोरडे असताना काढणी करावी. कांदा काढणीनंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २-२.५ सें.मी. लांब मान ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे, चिंगळी कांदे काढून टाकावेत. चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. खरिपातील कांदा काढणीवेळी पावसाची शक्‍यता असते. दोन ते तीन दिवस पावसाची शक्‍यता वाटत असल्यास काढणी लवकर (पुनर्लागणीनंतर ९०-१०० दिवसांनी) सुद्धा करता येईल. मात्र असे कांदे ताबडतोब बाजारात विकावेत.


हे पण वाचा: रांगडा कांदा रोपवाटिका व्यवस्थापन आणि टोमॅटो फळ तडकणे विकृती व उपाय.


टोमॅटो
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.
सेंद्रिय खते - प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड
रासायनिक खते - मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. याशिवाय एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट, २ किलो बोरॅक्‍स आणि १० किलो मॅग्नेशियम सल्फेट ही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावीत.
जैविक खते - एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
kr

Post a Comment (0)
Previous Post Next Post