कांदा-लसूण
कांदा बीजोत्पादनाकरिता खत व्यवस्थापन लागवडीच्या २० दिवस आधी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरवून नांगरट करावी. एकरी ५० किलो नत्र, २० किलो स्फुरद, २० किलो पालाश आणि २० किलो गंधक या रासायनिक खतमात्रेची शिफारस करण्यात आली आहे. कांदा लागवडीच्या आधी स्फुरद, पालाश आणि गंधक यांची पूर्ण आणि नत्राची निम्मी मात्रा द्यावी. खत जमिनीत चांगले मिसळावे. उरलेले २० किलो नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. कांदे लागवडीनंतर ३० दिवसांनी पहिला, तर ५० दिवसांनी दुसरा हप्ता द्यावा. कांदा पिकास लोह, तांबे, जस्त, मँगेनीज, बोरॉन आदी सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास, सल्फेटच्या रूपात १ ग्रॅम पावडर प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीवेळी त्यामध्ये स्टीकर ०.६ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी लागवडीनंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान करावी. दांड्यावर फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये.
️लसूण खत व्यवस्थापन आणि वेल वर्गीय पिके कीड नियंत्रण.
कोबी वर्गीय पिके
कीड नियंत्रण
चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) - कोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते. अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मीक नियंत्रण व्यवस्थापन करावे. लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर दोन ओळी मोहरी पेरावी. शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण लावावे. एकरी पाच कामगंध सापळे (झायलो ल्यूर) लावावेत. मोहरीवर अळ्या दिसू लागताच, क्लोरपायरीफॉस (२० इसी) १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. मुख्य पिकावर दोन अळ्या प्रतिरोप दिसू लागताच, पहिली फवारणी बॅसेलिस थुरींजिऐंसीस जीवाणूवर आधारित कीटकनाशकाची (बी.टी.) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी करावी. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री मित्रकीटक एकरी ४० हजार या प्रमाणात सोडावेत. दुसरी फवारणी, निंबोळी अर्क ४ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात करावी. तिसरी फवारणी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून करावी. आवश्यकतेनुसार चौथी फवारणी क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात करावी.