हरभरा
लागवड पद्धती
सारे पद्धत : मध्यम ते भारी जमीन, तसेच जमिनीचा उतार ०.३० टक्के असल्यास हरभरा पिकाची पेरणी पाभरीने अथवा पेरणीयंत्राने झाल्यानंतर सारायंत्राच्या सहाय्याने २.५-३ मीटर रुंदीचे सारे पाडावेत. साऱ्याची लांबी जमिनीच्या प्रतीनुसार ५०-१०० फूट ठेवावी. या पद्धतीत रानबांधणीस वेगळा खर्च करावा लागत नाही. सारायंत्रानेच बांध तयार होतात. मात्र जमिनीच्या उतारानुसार आडवे पाण्याचे पाट रिजरने टाकावे लागतात. या पद्धतीत पिकास सर्वत्र पाणी चांगले देता येते. तसेच मजूरही कमी लागतात. पाण्याचा प्रवाह ६-९ लिटर/सेकंद असावा.
वाफा पद्धत : जमिनीस उतार एकसारखा नसेल आणि सारे पद्धतीने पाणी भरणे शक्य नसेल, तर वाफा पद्धतीचा अवलंब करावा. सारायंत्राने २.५-३ मीटर रुंदीचे सारे पाडावेत. जमिनीच्या उताराप्रमाणे रिजर वापरून ५-१० मीटर अंतरावर आडवे पाट पाडावेत. वाफ्यातील जमीन समपातळीत असावी. पाण्याचा प्रवाह ६-८ लिटर/सेकंद ठेवावा. वरंब्याची १५-२० सें.मी. उंची पुरेशी होते. वाफ्यांना पाणी देण्याकरिता रिजरच्या साहाय्याने ८० सें.मी. रुंदीचे पाट पाडावेत.
सरी-वरंबा पद्धत : सरी-वरंबा पद्धतीमध्ये हरभऱ्यास हवे तेवढे माफक स्वरूपात पाणी देणे सोईचे होते. मध्यम ते भारी जमिनीसाठी ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूंस मध्यावर हरभरा बियाणे १० सें.मी. अंतरावर टोकावे. हलक्या ते मध्यम जमिनीकरिता ७५ सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूंस हरभरा बियाणे टोकावे. सरी-वरंबा पद्धतीमध्ये हरभऱ्यामध्ये मुळांना भुसभुशीत जमीन मिळाल्याने मुळे पीक अतिशय जोमदार वाढते आणि परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते.
भात पिक सल्ला व मका छोट्या यंत्राच्या सहाय्याने कणीस काढणी.
गहू
गव्हाच्या विशिष्ट वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य आहे. जिरायती जमिनीत गव्हाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. गव्हाच्या मुळ्या ०.६ ते १ मीटर खोलीपर्यंत वाढतात. त्यामुळे योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असावी. मशागत करताना शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी १.५ ते २ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. जिरायती लागवड ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी नेत्रावती (एनआयएडब्ल्यू १४१५), पंचवटी (एनआयडीडब्ल्यू १५) या जाती निवडाव्यात. प्रति एकरी ३० ते ४० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम याप्रमाणात प्रक्रिया करावी. जिरायत पेरणीसाठी दोन ओळींत २२.५ सें.मी. अंतर ठेवून दोन चाड्याच्या पाभरीच्या सहाय्याने रासायनिक खतांसह पेरणी करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी-आडवी न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते. जिरायत पिकास पेरणीच्या वेळी १६ किलो नत्र आणि ८ किलो स्फुरद प्रति एकरी द्यावे. गव्हात जरुरीप्रमाणे एक किंवा दोनवेळा खुरपणी करावी. कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.