कांदा-लसूण
ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बी (उन्हाळ) कांदा रोपवाटिका करावी. एक एकर क्षेत्रात रोप उपलब्धतेसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी होते. त्यासाठी २-३ किलो बियाणे लागते. मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण, दगडगोटे काढून टाकावेत. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. गादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणनियंत्रणासाठी, गादीवाफ्यांवर पेंडीमिथॅलिन २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी, ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक वापरावे. पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश १६००:४००:४०० ग्रॅम/ २०० वर्गमीटर याप्रमाणात खते द्यावीत. बियाण्याची पेरणी ओळींमध्ये ५-७.५ सें.मी. अंतरावर १-१.५ सेंमी. खोलीवर करावी. पेरणीनंतर चांगल्या कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे, त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे आहे. पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करावी. त्यानंतर नत्र ८०० ग्रॅम/ २०० वर्गमीटर याप्रमाणात द्यावे.
रोपवाटीकेतील पीक संरक्षण मर -
मेटॅलॅक्झील + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे. काळा करपा - मॅन्कोझेब १ ग्रॅम, जांभळा व तपकिरी करपा - ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिलि फवारणी प्रतिलिटर पाणी फुलकिडे - फिप्रोनील १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि फवारणी प्रतिलिटर पाणी
कापशीतील ‘लाल्या रोग’ व्यवस्थापण व सोयाबीन कापणीनंतर पिक सल्ला.
टोमॅटो
रोपे ४ ते ६ पानावर आल्यावर म्हणजेच २५ ते ३० दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे. टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत. लागवडीपूर्वी रोपे कार्बोसल्फान १० मिलि व कार्बेंडाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर १० दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्याठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून घ्यावेत.