पूर्वहंगामी ऊस
अधिक उत्पादनासाठी पूर्वहंगामी ऊस लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालवधीत करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवून डोळे दोन्ही बाजूस येतील हे पाहून लागवड करावी. यासाठी मध्यम जमिनीत ओल्या पध्दतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी एकरी दोन डोळयांची १०,००० टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. दोन रोपातील अंतर मध्यम जमिनीत १.५ फूट व भारी जमिनीत २ फूट ठेवावे. या पद्धतीने एकरी ५,४०० ते ५,६०० रोपे लागतील.
सुरु ऊस तपकिरी ठिपके उपाययोजना आणि आडसाली ऊस पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर.
आडसाली ऊस
ऊस लागवडीपूर्वी जीवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया केली नसल्यास, लागवडीनंतर दोन महिन्यांनी ४०० मि.लि. द्रवरूप ॲसेटोबॅक्टर २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी आणि प्रति एकरी ५०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक १०० किलो कंपोस्ट खतामध्ये मिसळून द्यावे. ऊस लागवडीस दोन महिने झाले असल्यास, मल्टि मॅक्रोन्युट्रीयंट (नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के व पालाश ८ टक्के) व मल्टि मायक्रोन्युट्रीयंट (ग्रेड २) द्रवरूप खत प्रत्येकी २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. तसेच तीन महिने झाले असल्यास, प्रत्येकी ३ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.