रांगडा कांदा रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण आणि वेल वर्गीय पिके फळमाशी नियंत्रण.

 कांदा-लसूण


🧅 रांगडा कांदा रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण : 
👉फूलकिडे – (फवारणी प्रति लिटर पाणी) फिप्रोनिल १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि. 
👉मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांसाठी – मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात रोपांच्या ओळीत द्रावण ओतावे.
 👉करपा रोग – (फवारणी प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ मिलि. *फवारणीवेळी ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
🧅 रोपांची काढणी व प्रक्रिया : रांगडा हंगामात ४५ दिवसांत रोप तयार होते. लागवडीच्या वेळी रोपांची गाठ हरभऱ्याएवढी असावी. रोपे उपटण्याअगोदर वाफ्यांना हलके पाणी द्यावे. मुळे न तुटता रोपे उपटता येतात. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. मुळे पाण्यात धुवून घ्यावीत. कार्बोसल्फान २ मिलि अधिक कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये रोपांची मुळे दोन तास बुडवून लागवड करावी.

वेल वर्गीय पिके



फळमाशी ही फळांच्या वरील पापुद्र्यात अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात. त्यामुळे फळे सडतात, वेडीवाकडी होतात आणि अकाली पक्व होतात. 
👉उपाययोजना – फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत. फळमाशीची कोषावस्था मातीत २ ते ३ सें.मी. खोलीपर्यंत आढळते. त्यामुळे वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी, जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होईल. विशेषतः नरमाशीच्या नियंत्रणासाठी क्यू ल्युरचे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. सापळे लावल्यामुळे शेतातील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. मादी माशीला मिलनासाठी नरांची उपलब्धता कमी होते, परिणामी मादी नराच्या शोधात अन्य ठिकाणी जातात किंवा अंडी फलीत न होण्याचे प्रमाण वाढते. फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मिलि अधिक गूळ १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या विषारी अमिषाची नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.

    कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
Post a Comment (0)
Previous Post Next Post