कापूस
कापशीतील बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना -
बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.
पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडणे रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.२ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, प्रोपीनेब (७० डब्लूपी) ३ ग्रॅम किंवा पायराक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
मका
कणसे पिवळसर, दाणे कडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावीत. ही कणसे २-३ दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत. दाण्यांतील पांढरी तुसे, बिट्ट्याचे तुकडे वेगळे करण्यासाठी उफनणी करावी. दाणे चांगले उन्हात वाळवून दाण्यांतील आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत ठेऊन साठवण करावी.