कांदा पिक खत व्यवस्थापन व टोमॅटो रोप नियोजन.

कांदा-लसूण



खत व्यवस्थापन
 👉वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत किंवा ३ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. शेणखत मिसळण्यापूर्वी वीस दिवस आधी त्यामध्ये एकरी २ किलो ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे. त्यामुळे ट्रायकोडर्माची वाढ होते.

 👉पिकासाठी द्यावयाची खतमात्रा ही जमिनीचा प्रकार, लागवडीचा हंगाम, वापरली जाणारी खते आणि खत देण्याच्या पद्धती यावर अवलंबून असते. माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी. 

👉एकरी नत्र ४४ किलो, स्फुरद १६ किलो, पालाश २४ किलो व गंधक (जमिनीतील प्रमाणानुसार) ६ ते १२ किलो याप्रमाणे खते द्यावीत. यापैकी १६ किलो नत्र आणि स्फुरद, पालाश, गंधक यांच्या संपूर्ण मात्रा रोपांच्या पुनर्लागवडीवेळी द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा नत्र खत जास्त आणि लागवडीच्या ६० दिवसानंतरसुद्धा दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, माना जाड होऊ लागतात. कांदा आकारामध्ये लहान राहतो, जोडकांद्याचे प्रमाण जास्त होते. साठवणक्षमता कमी होते. 

👉स्फुरद जमिनीत ३-४ इंच खोलीवर रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी द्यावे, म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते. 

👉स्फुरदाच्या बरोबरीने पालाशची पूर्ण मात्रा पुनर्लागवडीपूर्वी द्यावी. 

👉कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. पिकास सिंगल सुपर फास्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट खत दिले, तर गंधक वेगळा वापरण्याची गरज नाही.

टोमॅटो


टोमॅटो रोप उगवून येईपर्यंत सकाळ-संध्याकाळ झारीने पाणी द्यावे. रोप उगवल्यानंतर पाटाने गादीवाफ्याच्या चोहोबाजूने पाणी सोडावे. आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी भरू नये, नाहीतर जास्त पाण्यामुळे रोपे कोलमडून मरतात. रोपे उगवून दोन पानांवर आल्यानंतर शिफारशीनुसार कीडनाशकांचा रोपवाटिकेत वापर करताना ते मुळाशेजार�� उतरून मुरेल असे पाहावे, त्यामुळे रोग व किडीचे चांगले नियंत्रण ड्रेचिंगमुळे होऊन रोपांचे संरक्षण होते. रोपवाटिका ४० ते ५० मायक्रॉनच्या पांढऱ्या प्लॅस्टिकच्या कीडप्रतिबंधक जाळीने आच्छादून घ्यावी. त्यासाठी फारशी नेटची आवश्‍यकता नाही. साधारणतः अडीच फूट उंचीच्या काठ्या रोपवाटिकेतील गादीवाफ्याच्या बाजूने उभ्या करून त्यावर व चोहोबाजूने सभोवती प्लॅस्टिक नेट लावावी. त्यामुळे विषाणू रोग पसरविणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी उदा. फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी, तसेच अन्य किडींपैकी नागअळी आदींचा रोपवाटिकेत शिरकाव होणार नाही. त्यामुळे पुढे विषाणूजन्य रोगही आटोक्‍यात येण्यास मदत होईल, रोपवाटिकेतील पीक संरक्षणासाठी नंतर फारशी काळजी करावी लागणार नाही. कारण रोपवाटिका जमीन निर्जंतुकीकरणानंतर जर चुकून काही सूक्ष्मजीव राहिलेले असतील, तर बीजप्रक्रिया व ड्रेचिंग आणि पांढऱ्या प्लॅस्टिक नेटचे आच्छादन केल्यामुळे त्यांचाही बंदोबस्त होऊन नवीन किडींना रोपवाटिकेत येण्यास अटकाव होईल. फक्त हवामानात काही बदल झाले, तरच फवारणीची आवश्‍यकता भासेल. अन्यथा पुढील २१ दिवसांपर्यंत फवारणी घेतली नाही तरी चालते.

कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post