सुरुऊस  पोक्का बोंग रोग व्यवस्थापन तसेच आडसाली ऊस बेणे प्रक्रिया.

 सुरु ऊस 

पोक्का बोंग हा रोग फ्युजारियम बुरशीमुळे होतो. तीन ते सात महिन्यांच्या उसामध्ये मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस व मॉन्सूनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे हा रोग पानांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. अशा पानांचा आकार बदलतो. लांबी कमी होते व खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडा कूज व कांडी कापाची लक्षणे दिसतात. शेंडा कूज व कांडीकाप झालेल्या उसातील शेंडा जोम नष्ट होतो. त्यामुळे उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात व कालांतराने असे ऊस वाळतात. उपाययोजना - माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांची (मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये) मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी. - रोगामुळे शेंडा कूज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढावेत व नष्ट करावेत. - ऊस पिकावर रोग आढळून आल्यानंतर लगेचच, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. - शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा.


आडसाली ऊस


को. ८६०३२, को.एम. ०२६५, व्हिएसआय ८००५ या सुधारीत जातींची लागवड करावी. बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध, रोग-कीडमुक्त बेणे वापरावे. बेणे लांब कांड्याचे व फुगीर डोळ्याचे, रसरशीत असावे. दर तीन वर्षांनी बेणे बदलावे. काणी रोग तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम आणि डायमिथोएट ३०० मिलि प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५०% नत्र व २५% स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते. लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत करावी. रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत ५ फूट व मध्यम भारी जमिनीत ४ ते ४.५ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतरावर व दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून लागवड करावी. जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सरीत उसाची लागवड करून एक सरी रिकामी सोडावी. पट्टा पद्धतीचा आंतरपिके घेण्यासाठी व ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी उपयोग होतो.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा.
krushikapp

Post a Comment (0)
Previous Post Next Post