कांदा-लसूण:-
खरीप कांद्याकरिता पूर्वमशागत - शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन ��ोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडीखत किंवा ३ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. गादी वाफे १५ सें.मी. उंच, १२० सें.मी. रुंद असे ठेवावेत. दोन वाफ्यांत ४५ सें.मी इतके अंतर ठेवावे. यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल व काळा करपा रोगापासून रोपांचे संरक्षण होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक व तुषार सिंचनासाठी सोईची होते. ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादी वाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या २ लॅटरलचा (क्षमता ४ लिटर प्रतितास) वापर करावा. दोन ड्रिपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे. एकरी ४४ किलो नत्र, १६ किलो स्फुरद, १६ किलो पालाश द्यावे. जमिनीत एकरी १० किलोपेक्षा जास्त गंधक असल्यास एकरी ६ किलो गंधक द्यावे. एकरी १० किलोपेक्षा कमी गंधक असल्यास अशा जमिनीत एकरी १२ किलो गंधक द्यावे. पुनर्लागवडीपुर्वी १/३ नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र २ समान हप्त्यांत पुनर्लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी द्यावे. ॲझोस्पिरीलम आणि पी.एस.बी. या जैविक खतमात्रा प्रत्येकी २ किलो प्रतिएकर याप्रमाणे सेंद्रिय खतातून द्याव्यात. यामुळे नत्र व स्फुरद उपलब्धता वाढते.
मक्यातील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण,कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन
कोबी वर्गीय पिके
रोग नियंत्रण
घाण्या रोग (ब्लॅक रॉट) - प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो. नंतर तो कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढ जाऊन शेवटी इंग्रजी ‘व्ही’ किंवा त्रिकोणासारखा पट्टा पडतो. हा डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन प्रादुर्भावित भाग तपकिरी पडतो. रोगट भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त काळसर द्रव निघतो. म्हणून त्याला घाण्या रोग म्हणतात. रोग गड्डा आणि मुळापर्यंत पसरल्यास कोबी, फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे सडून जातात. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर त्वरित झाल्यास रोगग्रस्त झाड मरते. रोगाची लक्षणे दिसताच झाडाच्या खालील पाने काढून नष्ट करावीत. कॉपर ऑक्झीक्लोराइड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी.
करपा (ब्लॅक लिफ स्पॉट) - प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात. ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात. नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.