
अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण - प्रादुर्भाव ओळखून अळीच्या वाढीच्या पहिल्या तीन अवस्थांमध्ये योग्य उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे सोपे होते व नुकसान पातळी कमी ठेवता येते.
भौतिक नियंत्रण शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.
जैविक नियंत्रण अंड्यावर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा २० हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतात संध्याकाळी सोडावीत. किंवा नोमुरिया रायली ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणात मिसळून फवारणी करावी. किंवा इपीएन (उपलब्ध असल्यास) किंवा मेटारायझियम अॅनिसोप्ली ६ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थांमध्ये कडुनिंबावर आधारित कीटकनाशक (१५०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (१२.६ %) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५ % झेडसी) या संयुक्त कीटकनाशकाची ०.५ मि.लि. किंवा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.लि. फवारणी प्रतिलिटर पाणी किंवा भाताचा भुसा १० किलो आणि गूळ २ किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) १०० ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.

कापूस :-
कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन – मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी शक्यतोवर पेरणीनंतर दोन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. या काळात मित्रकीटक कापसाच्या शेतामध्ये बहुसंख्येने स्थिर होतील. परभक्षक कीटक ढालकिडा, हरित पंखी क्रायसोपा, कोळी आणि परोपजीवी कीटक ॲनासियस, ॲनागायरस, मावा परजीवी गांधीलमाशी कापसामधील तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींची संख्या मर्यादित राखण्यास मदत करतात. नीम तेल, एरंडी तेल, मासोळी तेल युक्त वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा (उदा. लिकॅनीयम लिकॅनी) वापर करावा. कमी विषारी असणाऱ्या कीटक वाढनियंत्रके, कीटकनाशके (उदा. बुप्रोफेजीन, स्पायरोमेसिफेन, डायफेन्थूरॉन इ.) यांचा पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करावा. कमी नुकसानकारक दुय्यम पतंग किडी (उदा. पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी) यासाठी रासायनिक फवारणी शक्यतो टाळावी. या अळ्या कापसाच्या झाडाला फारच कमी इजा पोचवतात, त्यामुळे परोपजीवी कीटकांना (उदा. ट्रायकोग्रामा, ॲपेन्टॅलीस आणि सिसिरिपा) इजा पोचणार नाही. हे कीटक अमेरिकन बोंड अळीच्या नैसर्गिक नियंत्रणाचे काम करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने पर्यावरणासाठी अति विषारी (वर्ग १) कीटकनाशकांचा वापर टाळावा. ही कीटकनाशके पर्यावरणाच्या व मित्रकीटकांच्या दृष्टीने हानिकारक ठरतात. कीटकनाशकांच्या मिश्रणाचा वापर टाळावा. मिश्रणाचा वापर पर्यावरणास अनुकूल नाही.