
भात पिकाच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रातूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे.
भाताचे सुधारित वाण हे कमी उंचीचे, न लोळणारे व खतास उत्तम प्रतिसाद देणारे आहेत. पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असून, कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे झाल्याने पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन कमी कालावधीत निसवतात.
हळवा वाण - कर्जत १८४, रत्नागिरी १, कर्जत ४, रत्नागिरी २४, रत्ना, फुले राधा, कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी ५
निमगरवा वाण - जया, पालघर १, फुले समृद्धी, रत्नागिरी ४, कर्जत ५, कर्जत ६, कर्जत ९
गरवा वाण - रत्नागिरी २, कर्जत २, मसूरी, रत्नागिरी ३, कर्जत ८
सुवासिक वाण - इंद्रायणी, भोगावती, पी.के.व्ही. खमंग
खार जमिनीसाठी वाण - पनवेल १, पनवेल २, पनवेल ३
पेरभातासाठी वाण - अंबिका, तेरणा, प्रभावती, सुगंधा, पराग, अविष्कार
संकरित वाण - सह्याद्री १, सह्याद्री २ (वाशिष्ठी), सह्याद्री ३ (सावित्री), सह्याद्री ४ (हंसा), सह्याद्री ५ (हिरकणी

पिकाच्या वाढीसाठी मध्यम काळी पोयट्याची व पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ पर्यंत सामू असणारी जमीन अतिशय उत्तम असते. जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरट दोन-तीन वर्षांतून एकदा करावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीला चांगले कुजलेले २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून नंतर जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी एक वखराच्या सहाय्याने पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते.

कापूस:-
कपाशीची लागवड मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलक्या जमिनीत ताण पडल्यास उत्पादनात घट येते. म्हणून कपाशीची लागवड हलक्या जमिनीत करण्याचे टाळावे. कपाशीची मुळे खोलपर्यंत जात असल्यामुळे जमिनीची खोली किमान ६० ते १०० सें.मी. असावी. लागवडीकरिता जमिनीचा सामू ६.५ ते ८.२ असावा.
शेतातील मागील हंगामातील पीक निघाल्याबरोबर शेतात असलेल्या घातक तणांचा (हरळी, नागरमोथा, कुंदा इ.) नाश करण्यासाठी दोन ते तीन वर्षांनी एक खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर ढेकळे फोडण्यासाठी जमीन मोगडावी. यामुळे तणांच्या काश्या मोकळ्या होण्यास मदत होते. मोगडणीनंतर दोन आठवड्यांच्या अंतराने तीन-चार वखर पाळ्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने दिल्यास काश्या पूर्णतः मोकळ्या होतात. या काश्या वेचून त्यांचा नायनाट करावा. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी एकरी २ टन शेणखत/ कंपोस्ट खत शेतात समप्रमाणात मिसळून टाकावे. गांडूळखत उपलब्ध असल्यास प्रति एकरी १ टन गांडूळ खत हे शेणखत/ कंपोस्ट खताबरोबर मिसळून द्यावे.

हळद:-
हळद या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ८० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता आहे. यापैकी संपूर्ण स्फुरद (५० किलो स्फुरद – ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि संपूर्ण पालाशची मात्रा (५० किलो पालाश - ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) हळद पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र (४० किलो नत्र - ८७ किलो युरिया) उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.

आले:-
आले या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्यकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता असते. यापैकी संपूर्ण स्फुरद (३० किलो स्फुरद - १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाशची मात्रा (३० किलो पालाश - ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (२४ किलो नत्र – ५२ किलो युरिया) आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र (२४ किलो नत्र – ५२ किलो युरिया) उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.