दुग्धोत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल तसेच दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंड वातावरणात ठेवल्यास फुफ्फ्सदाह (न्यूमोनिया) आजार होण्याची शक्यता असते. हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू श्वसनसंस्थेत शिरकाव करून आजार निर्माण करू शकतात. या आजारात नाकातून सुरुवातीला पातळ पाणी/ शेंबूड येतो. पुढे जाऊन तो घट्ट पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा होतो. जनावराचे खाणे-पिणे मंदावते, रवंथ करणे बंद होते. श्वसनाचा वेग वाढतो, जनावर बैचेन होते व दूध उत्पादन घटते. काही जनावरांत खोकणे/ढासणे आढळून येते. थंड वातावरण, लक्षणे व प्रयोगशाळा तपासण्या करून फुफ्फुसदाह आजाराचे निदान करता येते. फुफ्फुसदाह प्रतिबंधासाठी हिवाळ्यात दुधाळ जनावरांचे थंड वातावरणापासून संरक्षण करणे, गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवणे, स्वच्छ हवा गोठ्यात खेळती रहावी याचे नियोजन करावे. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे व तत्सम उपचार करून घेतल्यास जनावरातील फुफ्फुसदाह बरा होतो.
कमी तापमान आणि थंडीमुळे शेळ्या व लहान करडांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. ताप येतो, यामध्ये शरीराचे तापमान १०४-१०६ अंश फॅरनहाइटपर्यंत आढळते. शेळ्यांमध्ये ढासणे, खोकताना छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, तोंड पसरून श्वास घेणे, नाकातून स्राव येणे, भूक मंदावणे, मलूल बनून बसणे ही लक्षणे दिसून येतात. म्हणून शेळ्यांचा गोठा नियमित स्वच्छ व कोरडा ठेवावा. हिवाळ्यात नवजात करडांना उबदार ठिकाणी ठेवावे. जाळीला रात्री पडदे लावून अतिथंडीपासून शेळ्यांचे व करडांचे संरक्षण करावे. दिवसभर पडदे उघडे ठेवावेत. करडांना पुरेसा चीक व दूध पिण्यास द्यावे. बाटलीने दूध पाजताना ठसका न लागता, घाईघाईने न पाजता हळूहळू घोट घेईल तसे दूध पाजावे. प्रत्येकवेळी बाटली गरम पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावी. गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी भिंत कमी उंच, वर जाळी बसवलेली असावी. आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे. शेळ्यांना व करडांना त्यांच्या शारीरिक अवस्थेनुसार आहार द्यावा. शेळ्यांना संतुलित आहार, पशुखाद्य द्यावे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहील. व्यवस्थापनामध्ये अचानक बदल करू नयेत. शेडमध्ये वयानुसार, शारीरिक अवस्थेनुसार शेळ्या, पिले वेगळी ठेवण्याची व्यवस्था करावी. शेडमध्ये योग्य प्रमाणात जागा ठेऊन गर्दी टाळावी. शेळ्यांना, करडांना एका ठिकाणी बांधून न ठेवता ती फिरती राहतील अशी सोय करावी. शेड भोवतालची धूळ वाऱ्यासोबत शेडमध्ये येणार नाही, तसेच शेडमध्येही धूळ जास्त प्रमाणात होणार नाही याची काळजी घ्यावी. लेंडी तपासणी करून जंतनिर्मूलन करावे.
कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. ज्या कोंबड्या या आजारातून बऱ्या होतात, त्या अंडी देणे बंद करतात. सफल अंड्याचे प्रमाण कमी होते. या आजाराचा प्रसार हवेच्या माध्यमातून होतो. आजारी कोंबड्यांच्या विष्ठेवाटे, श्वासावाटे या आजाराचे विषाणू वातावरणात मिसळतात. त्यामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे शेडमधील खाद्यभांडी पाण्याची भांडीदेखील दूषित होतात. शेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बूट इत्यादी दूषित होऊन रोगाचा प्रसार होतो. आजारी कोंबड्यांच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडलेले रोगकारक विषाणू वातावरणात ६ महिने राहतात. आजाराने मृत्यू पावलेल्या कोंबड्यांची योग्य व्हिलेवाट न लावल्यामुळे त्यापासून आजाराचा प्रसार होतो. मांजर, कुत्रे, कामगार हे एका फार्मवरून दुसऱ्या फार्मवर आजाराचा प्रसार करतात. या आजारावर कोणतेही खात्रीलायक उपाचार नाहीत. आजार होऊ नये म्हणून पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली अँटिबायोटिक्सचा वापर करावा. प्रतिबंधात्मक लसीकरण करावे (लासोटा लस ५-७ दिवसांच्या पिलांना नाकात १ थेंब टाकून द्यावी. मुलेश्वर किंवा आरटूबी लस वयाच्या ६०व्या आठवड्यात इंजेक्शनद्वारे पंखामधून द्यावी). शेडमध्ये स्वच्छता राखावी. बाहेरच्या व्यक्तींना फार्मवर प्रवेश देऊ नये. आजाराचे निदान झाल्यावर आजारी कोंबड्या वेगळ्या कराव्यात. त्यांच्या खाद्य-पाण्याची व्यवस्था वेगळी करावी. आजाराने मेलेल्या कोंबड्या जाळून टाकाव्यात.