पूर्वहंगामी ऊस पिकास प्रतिएकरी १३६ किलो नत्र, ६८ किलो स्फुरद व ६८ किलो पालाश खतमात्रा शिफारशीत आहे. मात्र, ही खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. माती परिक्षमामुळे जमिनीचा सामू, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती कळते. को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त द्यावी. ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ ह्या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची वाढीच्या अवस्थेनुसार गरज लक्षात घेता उसासाठी चारवेळा खते विभागून देणे आवश्यक आहे. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा. उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.
आडसाली उसाची मोठ्या बांधणीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत. मोठी बांधणी करताना खताची शेवटची मात्रा देऊन संपूर्ण वरंबा पहारीच्या औजाराने किंवा लोखंडी नांगराने फोडून सायन कुळवाने कुळवावे. यामुळे ढेकळे बारीक होऊन तणांचाही बंदोबस्त होतो. दोन ओळींतील कुळविलेल्या क्षेत्रात रिजर चालवून पिकास भर द्यावी. त्यामुळे वरंब्याच्या ठिकाणी सऱ्या निर्माण होतात. या बांधणीच्या वेळी ६४ किलो नत्र (१३९ किलो युरिया), ३४ किलो स्फुरद (२१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. म्हणून नत्र, स्फुरद व पालाश या खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी. ऊस लागणीवेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला नसल्यास तसेच माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते १:१० या प्रमाणात सेंद्रिय खतांमध्ये मिसळून ४ ते ५ दिवस सावलीत मुरवून रांगोळी पद्धतीने सरीत द्यावीत.
ठिबक सिंचनाची सोय असल्यास ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते (८०:४०:४० नत्र, स्फुरद, पालाश किलो/एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे २६ हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खतांच्या मात्रेत बचत होते. ⭐खोडवा पिकांसाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/एकर/हप्ता) आठवडे - युरिया – १२:६१:०० – एम.ओ.पी. १ ते ४ आठवडे – ०६ – ०२ – १.५ ५ ते ९ आठवडे – १० – ०६ – ०२ १० ते २० आठवडे – ६.५ – ४.५ - ०२ २१ ते २६ आठवडे – ०० – ०० – ०४