भाजीपाला पिक सल्ला | krushikapp |

कांदा-लसूण 


लसूण लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात ३० दिवसांनी, तर दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा. लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फुलकिडे (थ्रीप्स) व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बोसल्फान २ मिलि अधिक ट्रायसायक्‍लाझोल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. या फवारणीनंतर १५ दिवसांनी, प्रोफेनोफॉस १ मिलि अधिक हेक्‍झाकोनाझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी. लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास, विद्राव्य गंधक २ ग्रॅम किंवा डायकोफॉल २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
वेल वर्गीय पिके       


⭐केवडा (डाऊनी मिल्ड्यू) या रोगाचा प्रादुर्भाव काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ इ. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये दिसून येतो. सुरवातीला पानाच्या वरच्या वाजूला फिक्कट हिरवट-पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ वातावरणात या ठिपक्यांच्या खालील बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी होतात. विशेषतः पूर्ण वाढ झालेल्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तीव्र प्रादुर्भावामध्ये पानाचे देठ, बाळ्या, फांद्यावरही आढळतो. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात, गळून पडतात. रोगग्रस्त वेलींना फुले-फळे कमी प्रमाणात, लहान आकाराची लागतात. त्यांचा दर्जा कमी आणि बेचव असतो. वेली लवकर सुकतात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. जमीन उत्तम निचरा होणारी असावी. योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी. रोगप्रतिकारक जातींचा उपयोग करावा. रोपवाटिकेमध्ये पेरणीपूर्वी मेटॅलॅक्झिल (३५ डब्ल्यूएस) ६-७ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी. खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश यामुळे रोगाचे प्रमाण कमी राहते. रोगांची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून दर ८-१० दिवसांच्या अंतराने, क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झि�्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्झिल+मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक)) २.५ ग्रॅम किंवा अॅझोक्झिस्ट्रॉबीन (२३ एससी) १ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने घ्यावी.

कोबी वर्गीय पिके 


सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उणिवा वा शरीरदोषांमुळे होणाऱ्या विकृती व त्यावरील उपाय ⭐ब्राउन रॉट (गड्डा कुजणे) - ही विकृती फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही विकृती आढळून येते. खोड व गड्ड्यावर भुरकट डाग दिसतात आणि त्यातून पाणी बाहेर येते. गड्ड्याचा दांडा पोकळ, काळपट पडून कुजू लागतो. संपूर्ण गड्ड्यावर भुरकट काळे, कुजकट डाग दिसतात. वालुकामय जमिनीत ही विकृती अधिक प्रमाणात होते. जमिनीत बोरॅक्स पावडर एकरी ८ किलो या प्रमाणात मिसळून द्यावी. लागवडीनंतर ३० दिवसांनी बोरॅक्स पावडर ४०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यातून पिकावर फवारणी करावी. शेतात सेंद्रिय खतांचा एकरी ८ ते १० टन वापर करावा. एकच पीक वारंवार न घेता पिकांची फेरपालट करावी. ⭐ब्लाइंडनेस (वांझ रोप) - ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात. लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत. रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी. कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमानास करावी. वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.

टोमॅटो  


रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणतः ६५ ते ७० दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते. प्रक्रियेसाठी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. परंतु, बाजारासाठी फळे निम्मी लाल व निम्मी हिरवी असताना तोडावीत. फळे जर लांबच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असतील तर पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावीत. अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात. गुलाबी लालसर झालेली फळे मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी तर पूर्ण लाल झालेली फळे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवावीत. तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस कीडनाशकांची फवारणी करू नये; अन्यथा फळांवर कीडनाशकांचे डाग व फळांमध्ये विषारीपणा राहतो. फळांची काढणी शक्‍यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी. फळांची काढणी झाल्यावर फळे सावलीत आणावीत व त्यांची आकारानुसार वर्गवारी करावी. नासकी, तडा गेलेली, रोगट फळे बाजूला काढावीत. चांगली फळे लाकडी खोक्‍यांत किंवा प्लॅस्टिक क्रेटमध्ये व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post