तंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...🎋🎋


सौजन्य : ✍️पी. व्ही. घोडके,
🏛️कषिविद्या विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,
मांजरी (बु.), जि. पुणे

फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. उसाचे उत्पादन प्रतिहेक्टरी ८५ ते १०० टन मिळालेले असावे. पिकात रोग, किडींचा प्रार्दुभाव नसावा. पूर्वहंगाम व सुरु लागवडीचा खोडवा ठेवावा.
उपलब्ध जातींमध्ये को ८६०३२, कोव्हीएसआय ९८०५, कोव्हीएसआय ०३१०२, व्हीएसआय ०८००५, कोएम २६५ आणि एमएस १०००१ या जातींचा खोडवा चांगला येतो. कोसी ६७१ आणि व्हीएसआय ४३४ या जातीला फुटव्याचे प्रमाण कमी असले तरी पाचट न जाळता आच्छादन करून वेळेवर खत मात्रा दिल्यास फुटवे चांगले फुटतात. लागण उसातील पाचट काढले नसेल तर एका हेक्टरमध्ये ८ ते १० टन पाचट निघते. याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो. शेतामध्ये पाचट कुजविल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जिवाणूंची वाढ चांगली होते. त्यामुळे हवा, पाणी संतुलित राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. कुजलेल्या पाचटातील अन्नघटक मिसळल्याने खोडव्याची वाढ चांगली होते.
🎋खोडव्यात सर्व सऱ्यांमध्ये पाचटाचा वापर :
• ऊसतोडणीनंतर शिल्लक राहिलेले पाचटाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सरीमध्ये बसविण्यात अडचणी येतात. यावर लागवडीतील किंवा खोडवा उसातील फक्त वाळलेले पाचट साधारणतः जून, जुलै महिन्यामध्ये काढून सरीमध्ये टाकून घ्यावे. यामुळे पाचटाचे प्रमाण २५ ते ३० टक्यांपर्यंत कमी होते. तोडणीनंतर निघणारे पाचट सरीमध्ये बसविणे सोपे जाते.
• लागण उसातील पाचट काढले नसल्यास एकरी ३.२ ते ४ टन पाचट निघते. ते शेतात कुजवल्यास उत्तम सेंद्रिय खत मिळते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जीवाणूंची वाढ चांगली होते. हवा, पाणी संतुलित राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. पाचटातील नत्र, स्फुरद, पालाश असे अन्नघटक मुळ्यांना मिळाल्याने खोडव्याची वाढ चांगली होते.
• ऊस तुटून गेल्यानंतर शेतातील सर्व सऱ्यांमध्ये पाचटाचे आच्छादन करावे.
• वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी. अन्यथा फुट कमी फुटते.

🎋पारंपरिक पद्धतीमध्ये पाचटाचे आच्छादन
• पारंपरिक ऊस लागण पद्धतीमध्ये (३ फूट ते ३.५ फूट सरी) एक आड एक सरी पद्धतीने पाचटाचे आच्छादन करावे.
• चार फूट किंवा ४.५ फूट अंतराची सरी काढून लागवड असल्यास खोडवा पिकाला पाचटाचे आच्छादन व्यवस्थित करता येते. पाचट आच्छादन करताना पूर्णपणे सरीमध्ये दाबून घ्यावे.
• बुडख्यावर पाचट ठेऊ नये. बुडखे मोकळे ठेवल्याने फुटवे चांगले फुटतात.
• मोठ्या बांधणीपर्यंत एक आड एक सरीस पाणी द्यावे. पाणी आच्छादन केलेल्या सऱ्यांना पाणी देऊन पाचट तुडवून घ्यावे. मातीशी संपर्क आल्याने पाचट लवकर कुजते.
• रिकाम्या सऱ्यांच्या बगला फोडून मशागत करावी.
• बगला फोडलेल्या सऱ्यांमध्ये शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करावा.
 🎋जोडओळ पट्टा पद्धत आणि रुंद सरी पद्धतीमध्ये पाचटाचे आच्छादन
• जोडओळ पट्टा लागवड पद्धतीमध्ये (२.५ फूट किंवा ३ फूट जोड ओळ आणि ५ फूट किंवा ६ फूट पट्टा) सर्व पाचट बसवून घ्यावे. दोन ओळींमध्ये यंत्राच्या साह्याने बगला फोडाव्यात.
• रुंद सरी पद्धतीत दोन सरीतील अंतर चार फूट किंवा त्यापेक्षा जास्त ठेवले असल्यास सर्व पाचट दोन सऱ्यांमध्ये बसवून घ्यावे.
• तुटलेल्या उसात पाचट बारीक करणारे यंत्र चालविल्यास पाच तासांमध्ये एक हेक्टरमधील पाचट बारीक करता येते. बारीक केलेले पाचट सऱ्यांमध्ये, मोकळ्या पट्ट्यात आच्छादन करावे. यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते. ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारे हे यंत्र आहे. ते जमिनीला न टेकता वरच्या वर उसाचे पाचट उचलून घेऊन ते बारीक करून जमिनीवर पसरविण्याचे काम करते.
अधिक वाचा 'कृषिक तज्ञ'मध्ये...


Post a Comment (0)
Previous Post Next Post