हरभरा
हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सेंमी खोल), पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणार्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते. वार्षिक ७०० ते १००० मिमि पर्जन्यमान असणार्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायती हरभर्याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत हरभऱ्याची पेरणी टाळावी. हरभर्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषत: पीक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १० ते १५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. हरभर्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सेंमी) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. खरीपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले असल्यास वेगळे देण्याची गरज नाही. परंतु ते दिले नसल्यास एकरी २ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
रब्बी ज्वारी
पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी. एकरी ५९ हजार रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. बागायतीमध्ये पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाचवेळी खत आणि बियाणे पेरावे. प्रति एकरी ४ किलोग्रॅम बियाणे लागते. रोपावस्थेत खोडमाशी आणि खोडकिडीचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायामेथोक्झाम (३० एफएस) १० मिलि या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर अॅसिटोबॅक्टर आणि अॅझोटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
