कृषी सल्ला |टोमॅटो,वेल वर्गीय पिके,कोबी वर्गीय पिके|-krushikapp


टोमॅटो 🍅🍅

टोमॅटो पिकामध्ये अनावश्‍यक फांद्या व पानांची गर्दी कमी होईल अशा पद्धतीने नियोजन करावे. कारण अतिरिक्त पानांमुळे पिकाच्या खालील भागात पानांची दाटी होऊन दमट वातावरण तयार होते. त्यामुळे कीड- रोगांच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण होते. तसेच, जुन्या पानांची प्रकाशसंश्‍लेषण करण्याची क्षमता संपून त्यांच्यात केवळ अनावश्‍यक घटकांचे प्रमाण असल्याने, अशी पाने व फांद्या खुरपणी करताना हाताने काढून टाकावीत. फुलधारणा, फळधारणा तसेच फळांची दर्जेदार वाढ होण्यासाठी आंतरमशागतीच्या कामांवर भर द्यावा. पिकात कोळपणी करावी व झाडांना मातीची भर द्यावी, ज्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना मिळण्याचे प्रमाण वाढेल. टोमॅटोमध्ये नत्राची उर्वरित अर्धी मात्रा (६० किलो नत्र - १३० किलो युरिया ४ समान हप्त्यांत - प्रत्येकी ३२ किलो युरिया) १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावी. वरखते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. शक्‍य असल्यास प्रति एकरी ८० किलो निंबोळीची ढेप द्यावी. त्याचा फायदा जमिनीतून निचऱ्यासाठी किंवा जलधारण क्षमता वाढण्यासाठी होतो.

वेल वर्गीय पिके
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडींची पिल्ले व प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे पाने वाकडी होतात, तसेच या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा थायमेथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान १ मिलि प्रति लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. शेतामध्ये पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येकी ५ प्रति एकरी याप्रमाणे पिकाच्या उंचीवर लावावेत. नागअळी व पाने खाणारी अळी प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ट्रायझोफॉस (४० इसी) १.५ मिलि किंवा क्लोरअँट्रॅनिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी द्रावणामध्ये स्टीकरचा वापर करावा. कीडग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.

कोबी वर्गीय पिके 
कोबीवर्गीय पिकांमध्ये सापळा पिक म्हणून मुख्य पिकामध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) व मावा या किडींचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेतच नियंत्रित करता येतो. पुनर्लागवडीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर आणि कडेने दोन ओळी मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या पुनर्लागवडीनंतर मोहरीवर मावा व अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू येताच, डायक्‍लोरव्हॉस (७६ इसी) १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सापळा पिकाची लागवड जास्त दाट न करता योग्य अंतर ठेवून करावी. सापळा पिकावरील अन्य रोग, किडी मुख्य पिकावर प्रस्थापित न होता लवकर नियंत्रणात आणाव्यात.

कांदा
सध्या रांगडा कांद्याची रोपवाटिका तयार करण्याचा कालावधी आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी सुमारे दोन गुंठे रोपवाटिका पुरेशी होती. त्यासाठी २-३ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेच्या जागेत लोखंडी नांगराने खोल नांगरणी करावी. नंतर दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे बनविण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे आणि दगड-गोटे काढून टाकावेत. तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतातून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून, त्यातील तण उगवून आल्यानंतर खुरपणी करून घ्यावी. त्यावर कांद्याचे बी पेरावे. रोपवाटिकेसाठी गादीवाफे १५ सेंमी उंच, १ मीटर रुंद, सोयीनुसार लांब आणि जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. पेरणीपूर्वी २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी टाकून जमिनीत चांगल्याप्रकारे मिसळावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेंडाझिम २ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो. रुंदीशी समांतर ५ ते ७.५ सेंमी अंतरावर रेघा पाडाव्यात. त्यात बी पातळ पेरून चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने झाकून टाकावे. नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे उपायुक्त ठरते. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० ग्रॅम, पालाश ४०० ग्रॅम आणि पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून नत्र ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणे खते द्यावीत.
                       कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
                                              
Post a Comment (0)
Previous Post Next Post