फळ पिक सल्ला |द्राक्ष,डाळिंब,केळी,संत्री/मोसंबी,आंबा | krushikapp


द्राक्ष 

कलम करण्याकरिता बागेत जमिनीच्या वर १ ते १.२५ फूट ८ ते १० मिमी जाड सरळ व सशक्त अशा २ ते ३ खुंटकाडीच्या फुटी आवश्‍यक आहेत. फुटी रसरशीत (सॅप फ्लो) असाव्यात. कलम यशस्वी होण्याकरिता ही परिस्थिती फारच महत्त्वाची असते. ज्या भागात बऱ्याच दिवसांपासून पाऊस नाही किंवा बागेत पाणी कमी दिले जाते, अशा बागेत कलम करण्याच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी पाणी द्यावे. बऱ्याचवेळा जुन्या काड्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. जुन्या काडीमध्ये आवश्‍यक असलेला (कलम करण्याकरिता) रस कमी असतो. यामुळे कलम केल्यानंतर कलम जोड लवकर भरण्याच्या प्रक्रियेत (कॅलस तयार होणे) अडचणी येतात. परिणामी कलम यशस्वी होत नाही. यावर उपाय म्हणजे अर्धपरिपक्व झालेली खुंटकाडी घ्यावी. बऱ्याचवेळा आपण खुंट काडीस वर काप घेतो. जमिनीपासून १ ते १.२५ फूट अंतरावर कलम करायचे असते, त्यामुळेच २ फूट किंवा खुंटकाडी राखून बागायतदार वरच्या फुटी कापून घेतात. बागेत जर तापमान वाढले असल्यास पानाद्वारे पाणीसुद्धा तितक्‍याच वेगाने निघून जाते. त्याचाच परिणाम म्हणजे जमिनीतून पाणी उचलले जाते. ज्या ठिकाणी काप घेतला, त्या ठिकाणी वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे सुद्धा वेलीवर दाब निर्माण होईल. परिणामी काडीमधून (काप घेतलेल्या ठिकाणातून) जास्त प्रमाणात पाणी निघून जाईल. असे झाल्यास कलम यशस्वी होण्यास अडचणी येतील. कलम करण्यापूर्वी काडीवरील बगलफुटी पूर्णतः काढून शेंडा मात्र तसाच वाढू द्यावा. त्यामुळे काडीत रस टिकून राहील.

डाळिंब 

मृग बहार धरलेल्या डाळींब बागेमध्ये तेलकट डाग, फळांवरील ठिपके व फळकूज हे रोग तसेच रसशोषक पतंगासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात : कीड-रोग प्रतिबंधात्मक म्हणून स्ट्रेप्टोमायसिन ०.२ ग्रॅम अधिक थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम अधिक सायपरमेथ्रिन (२५ इसी) १ मिलि अधिक निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिलि अधिक सर्फेक्टंट ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर आठवड्याच्या अंतराने ब्रोमोपॉल (२ ब्रोमो, २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल) ०.४ ग्रॅम अधिक फोसेटील एएल (८० डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

केळी 

पीक संरक्षण – ⭐️करपा : करपाग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन त्यांचा नाश करावा. बागेत कुठेही पाणी साचू देऊ नये. करपा रोग नियंत्रणासाठी, प्रोपीकोनॅझोल १ मिलि अधिक सर्फेक्‍टंट १ मिलि किंवा प्रोपीकोनॅझोल ०.५ मिलि अधिक मिनरल ऑइल १० मिलि किंवा कार्बेंडाझीम ०.५ ग्रॅम अधिक मिनरल ऑइल १० मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी कारवी. या बुरशीनाशकांची आवश्‍यकतेनुसार आलटून-पालटून फवारणी करावी. ⭐️इर्विनिया रॉट (पोंगा कुज) : या रोगाची लक्षणे दिसताच १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड, १५ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन, ३०० मिलि क्लोरपायरीफॉस मिसळून या द्रावणाची २०० मिली प्रतिझाड आळवणी (ड्रेचिंग) करावी. ⭐️फलकीड (थ्रीप्स): निसवणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शेवटचे पान बाहेर निघताना किंवा केळफूल बाहेर पडत असताना बेचक्‍यातील केळफुलावर फिप्रोनील (५ एससी) १.५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ⭐️फळ माशी : केळीच्या घडांची कापणी योग्य पक्वतेवर करावी. अधिक पक्व घडांवर फळ माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त केळी गोळा करून नष्ट करावीत. फळ माशीचा प्रादुर्भाव झालाच, तर बागेत ५० मीटर अंतरावर मिथील युजेनॉलचे सापळे ठेऊन फळ माशीचा बंदोबस्त करावा.

संत्री/मोसंबी

आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसत आहे. यासाठी बुरशीनाशकांसोबत २,४-डी, जिबरेलिक आम्ल व पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे. फळगळ नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम १०० ग्रॅम अधिक जिबरेलिक आम्ल १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर थायोफेनेट मिथाईल १०० ग्रॅम अधिक २,४-डी १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. २,४-डी व जिबरेलिक आम्ल ही रसायने पाण्यात पूर्णपणे विद्राव्य नाहीत. ही रसायने ४०-५० मिलि अल्कोहोल किंवा  आधी विरघळून घ्यावीत. बागेतील गळून पडलेली फळे गोळा करून, योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. किंवा कंपोस्ट खड्यात पुरून टाकावीत. बागेत अतिरिक्त पाणी साचू देऊ नये.
आंबा 

पूर्ण वाढ झालेल्या हापूस आंबा झाडांना मोहोर येण्याअगोदर ९० ते १२० दिवस पॅक्‍लोब्युट्रोझॉल हे वाढनियंत्रक वर्षातून एकदा द्यावे. कोकणात १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा कालावधी योग्य आहे. मात्र हा कालावधी पंधरवड्याने मागे-पुढे झाला तरी चालू शकते. पॅक्‍लोब्युट्रोझॉल देण्याअगोदर झाडाचा विस्तार मोजून प्रत्येक झाडाची मात्रा ठरवावी. यासाठी सर्वप्रथम झाडाच्या पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर पसाऱ्याचा व्यास मीटरमध्ये मोजावा व त्याच्या सरासरीला प्रति मीटर ०.७५ ग्रॅम क्रियाशील घटक पॅक्‍लोब्युट्रोझॉल (३ मिलि कल्टार/सेलस्टार) याप्रमाणे मात्रा द्यावी; म्हणजे एखाद्या झाडाचा पूर्व-पश्चिम व्यास १२ मीटर व दक्षिण-उत्तर व्यास १० मीटर असल्यास सरासरी (१२+१०/२=११) ११ मीटर होईल व त्या झाडास (११x३=३३) ३३ मिलि मात्रा योग्य होईल. पॅक्‍लोब्युट्रोझॉल ३ ते ६ लिटर पाण्यात ओतून द्रावण तयार करावे. झाडाच्या बुंध्याभोवती खताच्या रिंगेच्या आतील बाजूस १० ते १२ सेंमी खोलीचे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे काढावेत. या खड्डयामध्ये प्रत्येकी १०० ते २०० मिलिली द्रावण ओतावे व हे खड्डे मातीने भरून घ्यावेत. खड्डे शक्यतो टीकावाच्या साह्याने काढावेत, जेणेकरून खड्ड्याच्या खोलीवर नियंत्रण राहील. पहारीने खड्डे काढल्यास खोलीवर मुळांच्या संपर्कात पॅक्‍लोब्युट्रोझॉलची कमी मात्रा येते. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. काहीवेळा आंब्याची झाडे दगडाच्या गडग्याने बांधलेली असतात. अशावेळी पॅक्‍लोब्युट्रोझॉल आंब्याच्या बुंध्याभोवती पाण्यात मिसळून द्यावे अथवा आंब्याच्या खताच्या रिंगेत द्यावे किंवा खाणारी मुळे (फीडिंग रुट्स) शोधून त्याठिकाणी द्यावे.
                                       कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
                          
Post a Comment (0)
Previous Post Next Post