द्राक्ष 🍇🍇
ज्या वेळी बागेत पाऊस जास्त प्रमाणात झाला व मातीच्या प्रत्येक कणामध्ये पाणी साचले आहे अशा परिस्थितीत बोदामधील मुळी कार्य करणे बंद करते. कोणत्याही परिस्थितीत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली सुरूच असतात. या हालचाली होण्याकरिता द्राक्ष वेलीची मुळे कार्यरत राहणे तितकेच गरजेचे असते. या वेळी जमिनीतील मुळे कार्य करत नसल्यामुळे स्वतःच्या बचावाकरिता द्राक्षवेल वरील भागात (उदा. खोड, ओलांडा व काडी) मुळे तयार करून हवेतून अन्नद्रव्य शोषून घेते व आपली गरज पूर्ण करते. पाऊस थांबल्यानंतर व जमिनीतील पाणी कमी झाल्यानंतर बोदामधील मुळे कार्य होतात. त्यानंतर वेलीच्या वरील भागात निघालेली मुळे काळी पडतात. ती कार्य करणे थांबवतात. वरची मुळे सुकणे व जमिनीतील मुळांचे कार्य सुरू होणे यामध्ये थोडाफार कालावधी निघून जातो. म्हणजेच वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग काही काळाकरिता मंदावतो. वर नमूद केलेली परिस्थिती बागेत येऊ नये, यासाठी बोद थोडाफार उंच करावा. त्याच सोबत दोन ओळींमध्ये लहान चारी घेऊन बोदामधील पाणी निघून चारीच्या माध्यमातून बागेबाहेर जाईल. अशा प्रकारचे नियोजन करावे. यामुळे बोदामध्ये सतत हवा खेळती राहून मुळी कार्यरत राहण्यास मदत होईल. प्रत्येक वेलीवर मुळ्या फुटण्याची समस्या नसेल.
डाळिंब
मृग बहार धरलेल्या डाळींब बागेमध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे पिकाची कीड- रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फळधारणा झालेल्या बागेत बोरीक अॅसिड २ ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रण (ग्रेड २) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी करावी. तसेच ठिबक संचातून १९:१९:१९ हे विद्राव्य खत ३.२ किलो प्रतिएकर याप्रमाणात एक दिवसाआड महिनाभर द्यावे. पहिल्या फवारणीनंतर आठवड्याने मॅग्नेशियम सल्फेट २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच जमिनीतून नत्राची १/४ मात्रा (४ वर्षाखालील झाडांसाठी युरिया १३५ ग्रॅम प्रतिझाड किंवा ४ वर्षांपुढील झाडांसाठी २७० ग्रॅम प्रतिझाड) द्यावी.
केळी 🍌🍌
केळी बागेमध्ये पावसामुळे व वाऱ्यामुळे झाडाची पाने फाटल्याने अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. अशावेळी झाडावर असणारी पाने जास्तीत जास्त कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे. अतिवृष्टीमुळे झाडावरील पाने, खोड तसेच फळांना जखमा होऊन त्याठिकाणी बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. यासाठी संपूर्ण झाडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मिलि किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम सोबत स्टीकर १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
संत्री/मोसंबी 🍊
संत्रा/मोसंबी झाडास ४५० ग्रॅम युरिया किंवा १००० ग्रॅम अमोनियम सल्फेट, ६५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १०० ग्रॅम झिंक सल्फेट, १०० ग्रॅम फेरस सल्फेट आणि १०० ग्रॅम मॅंगनिज सल्फेट द्यावे. खते देण्याची पद्धत बांगडी पद्धत : २० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल अशी नाली झाडाभोवती बाहेरील घेरामध्ये. चौकोनी पद्धत : २० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल नाली झाडाभोवती चारही बाजूला. खड्डा पद्धत : ४-५ खड्डे १५-२० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल झाडाभोवती बाहेरील घेरात.
आंबा
