
शेळीपालन : जंतांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांच्या शरीरातील रक्त कमी होणे, अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, असे
परिणाम दिसून येतात. प्रत्येक जनावरामागे मिळणाऱ्या उत्पादनात घट होते.
त्यामुळे शेळ्यांच्या जंतनिर्मूलनाकडे विशेष लक्ष द्यावे. जंत वाढल्यानंतर
उपचार करण्यापेक्षा ते वाढू नयेत, म्हणून
प्रतिबंधक उपाययोजना करणे केव्हाही चांगले असते. म्हणून लेंडीच्या
ढिगाभोवती शेळ्या चरायला सोडू नयेत. सकाळी दहिवरात गवताच्या टोकावर
जंतांच्या अळ्या आलेल्या असतात. दहिवर हटल्यावर त्या गवताच्या मुळाशी जातात, त्यामुळे दहिवर हटल्यावर शेळ्या चरायला सोडणे योग्य आहे. चरण्यास जाणाऱ्या शेळ्यांना जंतांची लागण होतच राहते, म्हणून
पावसाळा सुरू होताना आणि पावसाळा संपताना असे दोनदा पशुवैद्याच्या
देखरेखीखाली जंतांचे औषध पाजावे. लेंड्यांची तपासणी करून आवश्यक असल्यास
इतर वेळेसही औषध पाजावे. शेळ्यांचा गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.
तळ्याच्या परिसरातील गोगलगाईंमध्ये काही जंतांच्या अळ्या वाढतात म्हणून
गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी योग्य ते उपाय योजावेत. तळ्यात बदके
पाळल्यानेही गोगलगाईंचा नायनाट होतो. हिरवा चारा थोडा वेळ उन्हात वाळवून मग
द्यावा. शेळीचे व्यवस्थापन चांगले केल्यास मरतुकीचे प्रमाण फक्त २ टक्के
राहते.
