पशुपालन : जनावरांच्या पोटातील कृमी किंवा शरीरातील जंताप्रमाणेच अंगावर आढळणाऱ्या डास, गोचीड, गोमाशा, उवा
यापासूनही जनावरांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे जनावरांना
गोचीड ताप/डेंगी यासारखे आजार होऊ शकतात. जनावरे दिवसा कोरड्या जागेवर
मोकळ्या हवेत बांधावीत. त्यामुळे गोठ्यातील फरशी/जाग कोरडी होण्यास मदत
होईल. तसेच गोठ्यात दिवसा भरपूर सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घ्यावी.
गोठ्यातील भिंती व गव्हाण यांना असलेल्या कड्याकपारी दुरुस्त करून बुजवून
घ्याव्यात. परजीवींचे प्रमाण जास्त असल्यास पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार
करावेत.
शेळीपालन : पावसाळ्यामध्ये
पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो. त्यानुसार शेळ्यांचे पावसापासून संरक्षण
होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ती उपाययोजना करावी. शेळ्यांना ठेवण्यासाठी
वेगवेगळी दालने असावीत. ज्यामुळे आजारी शेळ्या, पिले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील व शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा द्यावी. जेणेकरून गर्दी होणार नाही.

कुक्कुटपालन : वातावरण बदलाला कोंबड्या अतिसंवेदनशील असतात. पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होतात, त्यामुळे योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापकीय बदल न केल्यास, त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. सध्या पावसाळा सुरू होत आहे. अशा काळात कोंबड्यांच्या आरोग्याकडे आणि व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे. कोंबड्यांची शेड पूर्व-पश्चिम बांधलेली असावी. शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत. पोल्ट्री शेडवरील छताच्या पत्र्यांना छिद्रे पडलेली नाहीत, याची पावसाळ्यापूर्वी खात्री करून घ्यावी. छिद्रे असल्यास ती बंद करावीत. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचे पाणी शेडमध्ये गळणार नाही, याची काळजी घ्यावी. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत.