पिक सल्ला-| भात रोपवाटिका,आल्याची लागवड व हळदीची लागवड |- krushikapp

          
भात : चटई पद्धत-krushikapp
भात : चटई पद्धत – चटई पद्धतीने भात रोपवाटिका केल्याने रोपे कोठेही सहज वाहून नेता येतात. यांत्रिक पद्धतीने लावणी करण्यासही उपयोगी आहे. चटई पद्धतीने रोपवाटिकेसाठी लागणारे वाफे शेतात/खळ्यावर तयार करावेत. चटई रोपवाटिकेसाठी १.२ मी रुंद, १०० गेजचा प्लॅस्टीक कागद वापरावा. एक गुंठा क्षेत्रावर रोपवाटिकेसाठी २.५-३ किलो प्लॅस्टिक कागद लागतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी कागदाला छिद्रे पाडावीत. रोपवाटिका तयार करायची आहे तेथे प्लॅस्टीक कागद पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विटा/ बांबूच्या साह्याने उचलून घ्याव्यात. तयार वाफ्यामध्ये माती व शेणखत ६०:४० या प्रमाणात मिसळून ती १ मी लांब०.५ मी रुंद, १ इंच उंच लोखंडी फ्रेमच्या साह्याने ओतावी. माती व शेणखत फ्रेममधे टाकण्यापूर्वी ५ मिमीच्या चाळणीतून चाळून घ्यावे. प्लॅस्टिक कागदावर शेणखतमिश्रित माती टाकल्यानंतर झारीने पाणी शिंपडून माती ओली करुन हलकासा दाब द्यावा. अशा वाफ्यावर सुके किंवा रहू पद्धतीचे म्हणजेच बियाणे २४ तास पाण्यात भिजवून नंतर २४-३६ तास पोत्यामध्ये ठेऊन मोड आलेले बियाणे ५०० ग्रॅम/चौमी प्रमाणे फेकून पेरावे, नंतर चाळलेल्या शेणखतमिश्रित मातीने हलकेसे झाकावे. सुरवातीला २-४ दिवस पाणी फवारुन द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. रोपवाढीसाठी बी पेरण्यापूर्वी डीएपी २० ग्रॅम/चौमी क्षेत्रासाठी द्यावे. रोपे साधारण १२-१५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपे रोपवाटिकेतून गुंडाळी करून लावणीच्या ठिकाणी नेता येतात. यंत्राने लावणी करायची झाल्यास ८ इंच रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणीयंत्रात वापरता येतात.

           
सरी-वरंबा पद्धतीने आल्याची लागवड-krusikapp
आले : आल्याची लागवड उशिरात उशिरा १५ जूनपर्यंत करता येते. अन्यथा, उत्पादनात घट येते. मध्यम ते भारी जमिन आणि प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे. काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या गादीवाफा (रुंद वरंबा) पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. गादीवाफे तयार करत असताना दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावल्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सेंमी तर उंची ३० सेंमी ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी ठेवून, दोन कंदामधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरीतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सेंमी अंतर ठेवावे. आले लागवडीपूर्वी गादी वाफे पूर्णपणे पाण्याने भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आल्याची लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. त्यामुळे कंद गाभळण्याचे प्रमाण कमी होऊन कंदकुजीचा धोका टळतो.
        

हळद : हळदीची लागवड उशिरात उशिरा १५ जूनपर्यंत करता येते. अन्यथा, उत्पादनात घट येते. प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, तर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीसाठी गादीवाफ्यावर लागवड करावी. सरी-वरंबा पद्धतीने लागवडीसाठी ७५-९० सेंमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार ६ ते ७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५-६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी ३० सेंमी अंतरावर कंदांची लागवड करावी. कंदावर ३-४ सेंमी माती येईल या पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८-२९,००० कंद लागतात. गादीवाफा (रुंद वरंबा) पद्धतीने लागवडीसाठी ४-५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे, ६० सेंमी सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून, लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील व दोन कंदामधील अंतर ३० सेंमी राहते. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लावले जातात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफा १ फूट उंच व ४ फूट रुंद ठेवावा. दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतर ठेवून दोन ओळींमधील व दोन कंदांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. लागवडीवेळी कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
                                 कृषिक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
    



Post a Comment (0)
Previous Post Next Post