शेळी पालन :-
चाऱ्याची पौष्टिकता वाढावी व शेळ्यांनी चारा अधिक आवडीने खावा, यासाठी करावयाच्या भौतिक प्रक्रिया - मका, बरसीम, लसूण घास, चवळीसारख्या हिरव्या चाऱ्याच्या कुट्टीबरोबर मिश्रण करून वापरावा. मिठाचे पाणी शिंपडून चारा खारविण्याने किंवा १ ते ५ तास पाण्यात भिजवून त्यात हा चारा मिसळून दिल्यास चव वाढते. अंबोण भिजवून त्यांत चारा मिसळून दिल्यास चव वाढते. मात्र जास्त पाणी काढून वापरावे. एक किलो गहू, तांदूळ किंवा कुठल्याही कोंड्यात २०० ग्रॅम भुईमूग पेंड मिसळून दिल्यास तो प्रथिनयुक्त होतो व जनावरे आवडीने खातात. पेंडा किंवा गवत चाफ कटरने कापून बारीक करून दिला तरी तो शेळ्या आवडीने खातात. कुट्टी करण्यामुळे चारा तोडण्यात शक्ती वाया जात नाही. चारा खाल्ला जातो. गोळी करून वापरावा. सरमाड काढून लगेच वाळवावे, त्यावर बुरशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
पशु संवर्धन :-
उन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीस शेतकामांसाठी बैलजोडीचा वापर होतो. या काळात अतिश्रमामुळे बैलांमध्ये खांदेसूजी दिसून येते. हा आजार टाळण्यासाठी खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावे. समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी. दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन समान असावे. बैलांना भरपूर काम न देता थोड्या-थोड्या विश्रांतीने काम द्यावे. बैलांना सतत कामाचा ताण देऊ नये. जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेतकामास जुंपू नये. बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लाऊ नये. कच्च्या, खराब रस्त्यावर जास्त वजन असणारी गाडी नेऊ नये. खांदेसूज लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत. नुकत्याच सुजलेल्या भागावर ४-५ दिवस खांदेसूज कमी करणारे मलम लावावे. ताज्या सुजेत बर्फाने ३-४ दिवस शेकावे. मॅग्नेशियम सल्फेट ग्लिसरीनमध्ये मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते. जुन्या सुजेत गरम वाळू कपड्यात गुंडाळून किंवा गरम पाण्याने खांद्यास ४-५ दिवस शेक द्यावा. शेक देताना जनावरास पोळणार नाही याची खात्री करावी. गरम पाणी किंवा वाळूचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त असावे. खांद्यावर आलेल्या गाठी मऊ पू असणाऱ्या असल्यास पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून त्यातील पू काढून टाकावा, त्याचे रोज ड्रेसिंग करावे. उपचार करत असताना बैलाला कामाला जुंपू नये, पूर्णपणे आराम द्यावा. औषधोपचाराने खांद्यावरील गाठी कमी होत नसतील, तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात. त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी.
कुक्कुट पालन :-
अधिक अंडी देणाऱ्या कोंबड्या, तसेच मांसल कोंबड्या तयार करण्यासाठी चांगली गुणवत्ता असलेल्या प्रजातीची पिल्ले निवडावीत. कोंबडी शेड चांगले असावे. पिल्लांना योग्य व संतुलित आहार द्यावा. प्रभावी रोगनियंत्रण कार्यक्रम राबविणे आवश्यक असते. अंडी उबवणी केंद्रातून आणलेली पिल्ले ४८ तासांच्या आत पिल्लांसाठी तयार केलेल्या घरामध्ये (ब्रुडर हाऊस) स्थानांतरित करावीत. पिल्ले ही नेहमी पारखून घ्यावीत. निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. पिल्लांना उष्णता, तसेच थंडीपासून संरक्षण देणे गरजेचे असते. एक दिवसाची पिल्ले बाहेरच्या वातावरणाशी सहजपणे जुळवून घेऊ शकत नाहीत, तेव्हा कोंबडी नैसर्गिकरीत्या ज्या प्रकारे आपल्या पिल्लांना पाळते, त्याच प्रकारे कृत्रिमरीत्या पाळणे आवश्यक असते. ज्या जागी पिल्लांना पाळायचे आहे, ती जागा काही दिवस अगोदरच स्वच्छ आणि निर्जंतुक केली पाहिजे. खाण्या-पिण्याची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केली पाहिजेत. ब्रुडर घरामध्ये दोन इंच इतका साळीचा थर गादीसारखा अंथरावा, त्यावर पाच-सहा थरांमध्ये जुनी वर्तमानपत्रे टाकावीत. पिल्ले आणण्याच्या २४ तास आधीच ब्रुडरच्या तापमानाची खात्री करून घ्यावी. ब्रुडरखाली त्याच्या आकारानुरूपच पिल्लांची संख्या ठेवावी. पिल्लांना उबेच्या स्रोताजवळ ठेवण्यासाठी व्होवर गार्ड किंवा टिनच्या गोलाकार पत्र्याचा उपयोग करावा. पिल्ले एका जागेवर जमा होऊ नयेत, याकरिता घराचे कोपरे पुठ्ठे लावून गोल करावेत.
कृषिक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा