आंबा : हापूस, केसर, पायरी, तोतापुरी, नीलम या आंब्याच्या उन्नत जाती आहेत. तर आम्रपाली, रत्ना, सिंधू, साईसुगंध, कोकण सम्राट या संकरित जाती आहेत. महाराष्ट्रात कोकणातील उष्ण व दमट हवामान हापूस, पायरी या जातींना पोषक आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील कोरड्या हवामानात प्रामुख्याने केसरची लागवड केली जाते. एकदा जात निश्चित केल्यानंतर रोपे ही विद्यापीठ, शासकीय रोपवाटिका किंवा परवानाधारक रोपवाटिकेमधूनच घ्यावीत. कलमे शक्यतोवर एक वर्ष वयाची, चांगली वाढलेली, बुंधा जाड असलेली दणकट,
निरोगी असावीत. बऱ्याचवेळा शेतकरी दोन-तीन वर्षे व यापेक्षा मोठ्या कलमांचा
आग्रह धरतात. मात्र रोपवाटिकाधारक मागील वर्षाची शिल्लक राहिलेली लहान
कलमे मोठ्या पिशवीत भरून पुढील वर्षी विक्री करतात. त्यामुळे अशा कलमांची
मुळे बऱ्याचवेळा गुंडाळलेली असतात. तसेच सोटमूळही बऱ्याच ठिकाणी तुटलेले
असते. अशी दोन-तीन वर्षांची कलमे लवकर उत्पन्न मिळण्याच्या आशेने अधिक
किमतीस विकत घेतली जातात. मात्र जमिनीत लागवड केल्यानंतर दोन-तीन
वर्षांनंतर त्यांची वाढ आणि एक वर्ष वयाच्या कलमांची वाढ ही सारखीच झालेली
दिसून येते. म्हणून शक्यतोवर लागवड करताना मध्यम उंचीची, कलमांचा बुंधा जाड
असलेली, दणकट, निरोगी, एक वर्षाची कलमे निवडावी.

डाळींब : डाळिंबामध्ये
रोग-किडींचा प्रादुर्भावाची समस्या मोठी आहे. ती टाळण्यासाठी
सुरवातीपासूनच लक्ष देणे आवश्यक आहे. डाळिंबाची कलमे किंवा रोपे किंवा गुटी
ही खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. शक्यतो कृषी विद्यापीठाच्या
किंवा शासकीय रोपवाटिकेतून खरेदी करावी. गुटी खरेदी करतेवेळी मातृवृक्षांची
पाहणी जरूर करावी. रोगविरहित बागेमधील गुटीपासून तयार केलेली कलमे/रोपे
लागवडीसाठी वापरावीत. लागवडीसाठी लालसर तपकिरी रंगाची मुळे असलेल्या
गुटींची निवड करावी. अशाप्रकारच्या गुटींच्या लागवडीनंतर रोपांची मर
होण्याचे प्रमाण नगण्य असते. लागवडीच्या कमीत कमी एक महिना आधी १५x१० फूट (४.५x३ मीटर) अंतरावर १x१x१
मीटर आकारमानाचे खड्डे करावेत. लागवडीचे अंतर यापेक्षा कमी करू नये. असे
केल्यास झाडांची दाटी होऊन रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो. खड्डे काही
दिवस उन्हात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या खड्ड्यांचे
निर्जंतुकीकरण होते. खड्ड्यातील मातीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
कार्बेंडाझिम १ ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस ५ मिलि प्रतिलिटर पाणी या
प्रमाणात द्रावण प्रति खड्डा १० लिटर या प्रमाणात टाकावे. तसेच कॅल्शिअम
हायपोक्लोराईड १०० ग्रॅम प्रति खड्डा टाकावे. लागवडीपूर्वी खड्डे भरताना
प्रतिखड्डा शेणखत २० किलो, गांडूळखत २ किलो, निंबोळी पेंड ३ किलो,
ट्रायकोडर्मा प्लस हे जैविक बुरशीनाशक २५ ग्रॅम, अॅझोटोबॅक्टर १५ ग्रॅम,
पीएसबी १५ ग्रॅम मातीमध्ये चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावे.
संत्रा/मोसंबी :संत्रा/मोसंबी लागवडीसाठी
जमिनीची निवड करताना जमिनीची खोली कमीत कमी १ मीटर असावी. मात्र १
मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये लागवड केल्यास उत्तम उत्पादनासाठी
योग्यप्रकारे खते व मशागतीचा अवलंब करावा लागतो. निवडलेली जमीन ही
पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी, ८.३ पेक्षा कमी सामू असणारी, १२ टक्क्यांपेक्षा कमी मुक्त चुनखडीचे प्रमाण असणारी आणि स्थिर पाण्याची पातळी २ मीटरपेक्षा अधिक असणारी असावी. मे महिन्यामध्ये ७५x७५x७५ सेंमी आकाराचे खड्डे ६x६
मीटर अंतरावर खोदून ठेवलेले असावेत. खोदलेल्या खड्ड्यामध्ये सूर्यप्रकाश
पडून उष्णतेने निर्जंतुकीकरण होते. नवीन लागवडीसाठी मे महिन्यात खोदून
ठेवलेले खड्डे जून महिन्यामध्ये भरून घ्यावेत. खड्डे भरताना त्यात २ भाग
पृष्ठभागावरील गाळाची माती, १ भाग वाळू आणि १ भाग चांगले कुजलेले शेणखत अधिक १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ किलो निंबोळी पेंड व १०० ग्रॅम क्लोरपायरिफॉस भुकटी एकत्र मिसळून खड्डे भरून घ्यावेत.
केळी : केळी घड निसवण्याचा आणि पक्व होण्याचा कालावधी हा जात, हंगाम
तसेच लागवडीसाठी कंद (मुनवे) किंवा ऊतीसंर्वधित रोपांचा वापर यावर अवलंबून
असतो. ऊतीसंर्वधित बागेतील घड लागवडीपासून १२ ते १३ महिन्यांत कापणीला
येतात. अपरिपक्व केळी कापणीमुळे चव कमी होते. केळी पिकण्यात एकसारखेपणा
राहत नाही. खूप जास्त पक्व घड कापणीमुळे केळीची गळ होते. केळी लवकर पिकते, केळीची
साल तडकते. केळी साठवणीतील रोगांना लगेच बळी पडते. केळी स्थानिक
बाजारपेठेत पाठवायची असल्यास ९० टक्के पक्व झाल्यावर कापावी. लांबच्या
बाजारपेठेत पाठवण्यासाठी केळी ७५ टक्के पक्व झाल्यावर कापावीत. फण्यातील
केळीवरील शिरा (कोन) नाहीशा होऊन फळांना गोलाई येते तेव्हा ९० टक्के केळी
पिकली असे समजावे. फळावरील शिरा बाकी असताना अंतर शिरातील भाग फुगतो तेव्हा
७५ टक्के केळी पिकली असे समजावे.
कृषिक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा