खरीप पिक सल्ला -| सोयाबीन ,कापूस, मका |

सोयाबीन 
पावसाचा दीर्घकाळ खंड किंवा अधिक पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पीकवाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन घटते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत-जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीकवाढीसाठी अनुकूल जमीन तयार करण्यासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) लागवड पद्धत फायदेशीर ठरते. रुंद वरंबा सरी तयार करण्याची पद्धत - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, हैदराबादद्वारे विकसित बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. या यंत्रामध्ये ३० ते ४५ सेंमी अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सेंमी रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सेंमी अंतरावर कमी-जास्त करता येणारे दोन सरींचे फाळ आहेत. या यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५० सेंमी रुंदीचा रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सेंमी अंतरावर २ ते ४ ओळी घेता येतात. तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राने बियाणे व खते पेरता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व रोपांमधील अंतर शिफारशीनुसार कमी-जास्त करता येते. एकरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते. सोयाबीन पिकाच्या एका रुंद वरंब्यावर ३-४ ओळी आवश्यक अंतरानुसार घेता येतात. आवश्यक रुंदीचे रुंद वरंबे तयार होण्यासाठी दोन फाळांत आवश्यक अंतर ठेऊन त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. यावेळी सरीच्या फाळांमुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सऱ्या ३० ते ४५ सेंमी रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी-जास्त रुंद ठेवता येतात.



कापूस
गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी अस्सल बियाण्यांची पावतीसह खरेदी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या (१५० ते १६० दिवस) आणि तुडतुड्यास प्रतिकारक असणारे वाण/बीटी संकरित वाणांची लागवड करावी. बीटी बियाण्यासोबत १२० ग्रॅम नॉन बीटी बियाणे दिलेले असते, त्याची पेरणी बीटी कपाशीभोवती आश्रय पीक (रेफ्युजी) म्हणून पाच ओळींमध्ये करावी. या नॉनबीटी बियाणांची फुलोरावस्था व बोंडावस्था बीटी संकरित वाणासारखीच असावी. ज्या वाणांच्या बीटी बियाण्यांतच नॉन बीटी बियाणे मिसळलेले (रेफ्युजी इन बॅग) असेल तर वेगळ्या आश्रय ओळी लावण्याची गरज नाही. सापळा पीक म्हणून भेंडीची उशिरा पेरणी करावी, त्यामुळे त्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात फळे लागतील. गुलाबी बोंडअळी या पिकाकडे आकर्षित होते. कापूस पिकामध्ये युरियाचा अतिरिक्त वापर टाळावा. सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत, तीन महिन्यांपर्यंत कीटकनाशकाचा वापर टाळावा. या काळात वनस्पतीजन्य कीडनाशके, निंबोळी अर्क आणि मित्रकीटकांचा वापर करावा. यामुळे नैसर्गिक मित्रकीटकांचे संरक्षण होईल. सुरवातीच्या तीन महिन्यांमध्ये पिकांचा कालावधी वाढविणाऱ्या नवीन वर्गातील निओनिकोटिनॉईडस गटातील (इमिडाक्लोप्रीड, थायोमेथोक्झाम, ) आणि ऑरगॅनो फॉस्फेट गटातील (मोनोक्रोटोफॉस,  यासारख्या) कीटकनाशकांचा वापर टाळावा. कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी काटेकोरपणे टाळावी.

मका    
corn-krushikapp
खरीप हंगामात १५ जून ते १५ जुलै दरम्यान शक्यतो समाधानकारक (७५ ते १०० मिमी) पाऊस झाल्यानंतर वाफश्यावर सपाट वाफा पद्धतीने मक्याची पेरणी करावी. पेरणीस उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. परिणामी रोपसंख्या घटते व उत्पादन कमी मिळते. मका पेरणी टोकण पद्धतीने जमिनीत ४ ते ५ सेंमी खोलीवर करावी. पेरणीचे अंतर उशिरा व मध्यम वाणांसाठी ७५ x २० सेंमी, लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी ६० x २० सेंमी ठेवावे. पेरणीसाठी प्रति एकरी ६ ते ८ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (करपा रोगप्रतिबंधासाठी) २.५ ग्रॅम व इमिडाक्लोप्रिड ४८ एफएस (वाळवी, खोडकिड प्रतिबंधासाठी) ४ मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर जीवाणू संवर्धक खते  आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू (पी.एस.बी.) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तणनियंत्रणासाठी पेरणी संपताच चांगल्या वापशावर १ किलो प्रतिएकरी २०० लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. तणनाशक फवारणीनंतर १५ ते २० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये.
                    कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
    

Post a Comment (0)
Previous Post Next Post