फळ पिक सल्ला (krushikapp)




 द्राक्ष
 द्राक्ष
लवकर छाटणी केलेल्या बागेमध्ये आता कॅनोपी पूर्ण तयार झालेली आहे. सबकेन तयार झालेले आहेत किंवा शेवटच्या टप्प्यात असतील. अशा बागेमध्ये पाने जुनी होत आहेत. अशा स्थितीमध्ये ढगाळ वातावरणामध्ये जुन्या होत असलेल्या कॅनोपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. भुरीच्या प्रतिबंधासाठी कॅनोपी मोकळी करणे उपयुक्त ठरू शकते. यासोबत आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी फायद्याची ठरेल. यासाठी ट्रायझोल गटातील हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मिलि प्रतिलिटर पाणी याचा वापर करता येईल. दाट कॅनोपीमध्ये आधीच प्रादुर्भाव झालेला असल्यास वरील फवारणी उपयुक्त ठरू शकेल. वेळेवर छाटणी केलेल्या बागेमध्ये सध्या फुटी निघालेल्या असतील किंवा काही परिस्थितीमध्ये विरळणी ते सबकेन करण्याच्या स्थितीमध्ये बाग असेल. सध्याचे तापमान फुटींच्या चांगल्या वाढीसाठी पोषक आहे. ज्या बागेत नवीन फुटी निघाल्या आहेत, परंतु पुन्हा काही फुटी निघत असतील, अशा स्थितीमध्ये वेलीवर पाण्याची फवारणी २-३ दिवस करावी. यामुळे कमी होत असलेल्या तापमानामध्ये आर्द्रता वाढून उशिरा निघणाऱ्या फुटी निघण्यास मदत होईल. यावेळी नत्राचा वापर काळजीपूर्वक व्हावा. कारण सबकेन झाल्यानंतर जेव्हा बगलफुटी निघायला सुरवात होते, त्यावेळी वेलीमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था सुरू होते. अशावेळी वेलीचा जोम वाढल्यास घडनिर्मितीत अडचणी येऊ शकतात. ज्या बागेमध्ये सबकेन केल्यानंतर वेलीचा जोम अधिक असतो, त्याठिकाणी स्फुरद जास्त आणि पालाश कमी असलेल्या खताच्या ग्रेडचा वापर करावा. जास्त जोम असलेल्या परिस्थितीमध्ये बागेत ०-०-५० एकरी ५ किलो प्रमाणामध्ये जमिनीतून देता येईल.


डाळिंब
 डाळिंब

मुख्य अन्नद्रव्यांचे कार्य व कमतरतेची लक्षणे - नत्राची कार्ये : छाटणीनंतर डोळेफुटीसाठी तसेच फुटीची व पानांची एकसारखी वाढ होण्यासाठी. हरितद्रव्ये व प्रथिने निर्मितीसाठी फळांमध्ये रसाचे प्रमाण वाढण्यासाठी. कमतरतेची लक्षणे - झाडाच्या फांदीवरील परिपक्व, जुने झालेली पाने पूर्णपणे पिवळी पडतात. पूर्ण पिवळी पडलेली पाने दुमडतात व त्यामुळे पानांचे तुकडे होतात. जास्त प्रमाणात नत्राची कमतरता असल्यास पिवळ्या पडलेल्या पानांची टोके वाळतात. हरितद्रव्यांच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंद होते. झाड पूर्णपणे पिवळे पडून वाढ खुंटते. स्फुरदाची कार्ये : मुळ्यांची वाढ चांगली होण्यासाठी. काडीमध्ये फळधारणा चांगली होण्यास मदत होते. फळांचा आकार मोठा होण्यासाठी. कमतरतेची लक्षणे - पानाची टोके पिवळी पडतात. फळांची संख्या कमी, फळ गळ वाढते. फुलोरा कमी निघतो व फळधारणा चांगली होत नाही. पाने लंबगोलाकार होतात. पानांची रुंदी कमी होऊन आकाराने लहानच राहतात. स्फुरदाची कमतरता जास्त प्रमाणात असल्यास पाने पिवळी पडल्यावर गडद तांबूस होतात. स्फुरदाचा जास्त अतिरे��� झाल्यास जस्ताची कमतरता येते. पालाशची कार्ये : फळांचा रंग, चव, वजन व गुणवत्ता वाढते. फळाचा टिकावूपणा, चकाकी वाढते. झाडांची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकूल हवामानाशी झगडण्याची ताकद वाढते. कमतरतेची लक्षणे - पाने बाहेरील बाजूस दुमडतात. जुनी व पिवळी पाने कडांकडून मध्य शिरेकडे पिवळी होत जातात व वाळतात. फळे योग्य गुणवत्तेची तयार होत नाहीत. झाडे विविध रोगास सहजासहजी बळी पडतात.


केळी
केळी

करपा - रोगग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. नियंत्रणासाठी मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम किंवा प्रॉपिकोनॅझॉल १ मिलि अधिक सर्फेक्टंट १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकतेनुसार बुरशीनाशक आलटून पालटून फवारणी करावी. फुलकिडे - केळी निसवत असताना केळ कमळात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे फळाची साल खरवडतात. त्यामुळे फळावर लालसर डाग दिसतात, फळांची प्रत खालावते. त्यामुळे फुलकिडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून घडावर फवारणी करावी किंवा निंबोळीवर आधारित कीडनाशक (१०००० पीपीएम अॅझाडिरेक्टीन) पाच मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घड निसवतेवेळी सिटामीप्रीड ०.१२५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संत्री/मोसंबी
संत्री/मोसंबी
नवीन संत्रा/मोसंबी बागेच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करताना जमिनीची खोली कमीत कमी एक मीटर असावी. मात्र एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये संत्रा/ मोसंबी लागवड केल्यास योग्यप्रकारे खते व मशागतीचा अवलंब करावा लागतो. निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी, ८.३ पेक्षा कमी सामू (पीएच) असणारी, १२ टक्क्यांपेक्षा कमी मुक्त चुनखडीचे प्रमाण असणारी आणि स्थिर पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक असलेल्या जमिनीची निवड करावी. निवड केलेल्या जमिनीमध्ये मे महिन्यामध्ये ६ x ६ मीटर अंतरावर ७५ x ७५ x ७५ सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खोदलेल्या खड्ड्यामध्ये सूर्यप्रकाश पडून उष्णतेने निर्जंतुकीकरण होते.
आंबा
आंबा
निर्यातक्षम आंबा फळांची काटेकोरपणे प्रतवारी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रथम डागी आणि बिनडागी ���शी फळांची प्रतवारी करावी. निर्यातीसाठी "बिनडागी' आंबे असणे महत्त्वाचे आहे. आवेष्टणगृहात रोगट, डागी फळे वेगळी करावीत, तसेच बिनडागी आणि निरोगी फळांची विक्रीसाठी प्रतवारी करावी. काढलेल्या आंब्याचे देठ २ सेंमी कापून घ्यावेत. आंबा फळे पिकताना कुजू नयेत म्हणून फळांना शिफारशीत प्रक्रिया करावी. आंबे नंतर सावलीत किंवा पंख्याखाली कोरडे करावेत. १४ आणे (८५% परिपक्व) आंबा फळांची प्रतवारी वजनानुसार पुढीलप्रमाणे करावी: अ+ - ३०१ ग्रॅमपेक्षा जास्त, अ - २५१ ते ३०० ग्रॅम, ब - २२६ ते २५० ग्रॅम, क - २०१ ते २२५ ग्रॅम, ड - १७५ ते २०० ग्रॅम, १७५ ग्रॅमपेक्षा कमी वजनाची फळे विक्रीसाठी पाठवू नयेत. आंबा फळांची प्रतवारी केल्यानंतर फळे १, , , ४ डझन क्षमतेच्या आकर्षक अशा पुठ्ठ्याच्या (कोरूगेटेड फायबर बोर्ड) बॉक्‍समध्ये पॅक करावीत. अशा खोक्‍यांना वायुविजनासाठी रुंदीच्या बाजूला २ सेंमी व्यासाची दोन-दोन छिद्रे असावीत आणि आवश्‍यकतेप्रमाणे वायुविजनासाठी छिद्रे असलेले पुठ्ठ्याचेच विभाजक वापरावेत. या बॉक्‍समध्ये गवत, भाताचा पेंढा किंवा इतर कोणतेही पॅकिंग साहित्य वापरू नये. व्यवस्थितपणे भरलेली खोकी टेपने बंद करावीत. खोक्‍यावर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, जातीचे नाव, फळांची संख्या, वजन, बॉक्‍स भरल्याची तारीख आणि उघडण्याची तारीख लिहावी. फळे भरलेली खोकी उन्हात ठेवू नयेत.

                   कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
   


Post a Comment (0)
Previous Post Next Post