खरीप पिक सल्ला (कापूस, सोयाबीन, तूर व भात) - Krushik app


कापूस
खरीप पिक सल्ला (कापूस, सोयाबीन, तूर) - Krushik app

पिकांची फेरपालट – सतत एकच पीक त्याच जमिनीत घेतल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट येते. पुढील हंगामात तेच पीक घेतल्यास मातीतील त्याच खोलीतून अन्नद्रव्यांचे पिकाद्वारे शोषण होते. यामुळे त्या खोलीवर उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते. त्याशिवाय त्याच पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडी काही काळासाठी मातीमध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामात पुन्हा तेच पीक घेतल्यास त्या किडींचा पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतो. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कापूस पिकानंतर पुढील वर्षी ज्वारी, सोयाबीन, मूग किंवा उडीद अशी फेरपालट करणे आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, शेतीची उत्पादकता वाढविणे व उत्पादनातील शाश्वतता राखण्यासाठी पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे आवश्यक आहे.


सोयाबीन 
खरीप पिक सल्ला (कापूस, सोयाबीन, तूर) - Krushik app

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत असावे. दरवर्षी नवीन बियाणे घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते, पर्यायाने आर्थिक लाभही कमी होतो. सोयाबीनमध्ये सर्वच वाण हे सरळ वाण आहेत, त्यामुळे अशा वाणांचे बियाणे दरवर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २-३ वर्षापर्यंत वापरता येते. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता चाचणी आवश्यक आहे. त्यावरुन चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटते. पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबद्दल अंदाजही येऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या बियाण्याची चाळणी करून त्यातील काडीकचरा, खडे, लहान, फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ केलेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा कागद घेऊन त्याला चार घडया पाडाव्यात, यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेऊन त्याची गुंडाळी करावी. अशारितीने १०० बियांच्या १० गुंडाळया बनवाव्यात. या गुंडाळया पॉलिथीन पिशवीत ४ दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनी त्या हळूहळू उघडून त्यामध्ये अंकुरित झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या ७५ असेल तर उगवणक्षमता ७५% आहे असे समजावे. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजेच ७०-७५% असेल तर शिफारशीत मात्रेत किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवणक्षमता कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.

तूर 
तूर पिकास मध्यम ते भारी (३० ते ४५ सेंमी खोल), पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
खरीप पिक सल्ला (कापूस, सोयाबीन, तूर) - Krushik app
तुरीच्या पिकास चोपण, पाणथळ व क्षारयुक्त जमीन मानवत नाही. पिकवाढीस जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्याने रोपे पिवळी पडतात. तुरीची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर एकरी ६ ते ८ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/कंपोष्ट खत जमिनीत मिसळावे. तुर लागवडीसाठी जमीन व पर्जन्यमानानुसार जातींची निवड करावी. प्रचलित वाण : विपुला, फुले राजेश्वरी, आयसीपीएल ८७, आयसीपीएल ८७११९, एकेटी ८८११, बीएसएमआर ८५३, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ७११, बीडीएन २, बीडीएन ७०८, पिकेव्ही तारा. आयसीपीएल ८८६३ हा वाण मारुती नावाने प्रचलित असून लागवडीसाठी अयोग्य आहे. या जातीला तयार होण्यासाठी १६५ ते १७५ दिवसांचा कालावधी लागतो. वांझ या विषाणूजन्य रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते. यासाठी या वाणाची लागवड करू नये.

भात    
भाताचे बी निरोगी व वजनदार असावे. त्यासाठी भात बियाणे ३ टक्‍के मिठाच्या द्रावणात बुडवावे. यावेळी पाण्यावर तरंगणारे पोचट, हलके, कीडग्रस्त, रोगट बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक आणि जीवाणूनाशकांची पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम/ थायरम/ कॅप्टन २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी अॅग्रीमायसीन ०.२५ ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोसायक्‍लिन ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात बियाणे आठ तास भिजवावे. त्यानंतर अझोटोबॅक्‍टर व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. एक एकर क्षेत्रावर भात लागवडीसाठी ४ गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. पेरणीकरिता १-१.२ मीटर रुंद व ८-१० सेंमी उंच आणि आवश्‍यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. वाफे तयार करताना एक गुंठा क्षेत्रास २५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद व ५०० ग्रॅम पालाश मातीत मिसळावे. वाफ्यावर रुंदीस समांतर ओळीमध्ये ७-८ सेमी अंतरावर आणि २-३ सेंमी खोलीवर बियाणे पेरून मातीने झाकावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रतिगुंठे ५०० ग्रॅम नत्र द्यावे.
 
                                        कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post