फळ पिक सल्ला


आंबा
आंबा : साधारणपणे फळधारणेपासून पक्व होण्याकरिता हवामानानुसार तीन महिन्यांचा कालावधी लागतो म्हणून फळे योग्यवेळी तोडणे महत्त्वाचे ठरते. कलमाखाली पाड वा टपका लागून रोज २ ते ३ फळे झाडाखाली दिसत असल्यास फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांचा रंग फिक्कट हिरवा झाल्यास अशी फळे काढणीस तयार झाली असे समजावे. आंबा फळांच्या देठाजवळील दोन्ही बाजू फुगून देठाच्या सम पातळीत आल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळे काढणीस तयार झाल्यानंतर फळांवर तेलग्रंथी स्पष्टपणे दिसून येतात म्हणजे फळे ताबडतोब काढवीत. फळांची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ नंतर तापमान कमी असताना करावी. नूतन झेल्याचा वापर करून फळे एकाच टप्यात न उतरविता २ ते ३ वेळा उतरावीत. नूतन झेल्याने फळे तोडताना देठ ३.५ सेंमी ठेऊन काढणी करावी. फळे तोडताना देठ पूर्णपणे मोडल्यास फळातील चिकट द्रव फळावर पसरून फळाचा आकर्षकपणा कमी होतो. पाऊस पडल्यानंतर काढलेली फळे हमखास कुजतात, त्यासाठी फळे तयार झाल्यानंतर काढणीस उशीर करू नये. फळे काढताना वा काढणीनंतर फळांची हाताळणी करताना फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळे काढणी नंतर तापलेल्या जमिनीवर न ठेवता किंवा सावलीत एकमेकांवर न ठेवता सुटी ठेवावीत, जेणेकरून फळे एकमेकांना घासून ओरखडणार नाहीत. आंबा विक्री करताना रंग, वजन, आकार पाहून, प्रतवारी करून विक्री करावी.

द्राक्षे : ज्या ठिकाणी सबकेन झाले आहे अशा बागेत सूक्ष्म घडनिर्मितीकरिता संजीवकांचा वापर महत्त्वाचा
द्राक्षे
ठरतो. काडीवरील डोळ्यामध्ये सूक्ष्म घडनिर्मिती झाली, याचा अर्थ त्या डोळ्यामध्ये द्राक्षघड तयार झाला. त्या डोळ्यात प्रथिने तयार होतात. याकरिता वेलीमध्ये न्युक्लिक अॅसिड व सायटोकायनीनची पातळी वाढवणे महत्त्वाचे असते. काडीवरील डोळ्यावर जर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश मिळाल्यास ही पातळी सहज वाढते. संजीवक वापरण्याची आवश्यकता नसते. ज्या बागेत दाट कॅनोपी असून, उशिरा खरड छाटणी झाल्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीच्या कालावधीत ढगाळ वातावरण असेल किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव असेल अशावेळी संजीवकांची गरज असेल. खरड छाटणीनंतर ४० व ४५ व्या दिवसी ६ बी.ए. १० पीपीएम आणि ४५ व्या दिवशी युरासील २५ पीपीएम अशी फवारणी केली जाते. यापेक्षा बागेत सबकेन केले असल्यास निघालेली बगलफूट ३-४ पानांची झाल्यास ६ बी.ए.ची पहिली फवारणी व त्यानंतर बगलफूट ६-७ पानांची झाल्यानंतर युरासीलची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार बागेत काड्यांची संख्या राखून इतर फुटी काढल्याची खात्री करावी. निघालेल्या बगलफुटीपैकी आवश्यक तितक्या फुटी राखाव्यात (सिंगल सबकेन व डबल सबकेन). कॅनोपी मोकळी राखण्याचा प्रयत्न करावा. यामुळे सूक्ष्म घडनिर्मिती होण्यास मदत होईल.

डाळींब : डाळिंबाची लागवड विशेषतः हलक्या, बरड, खडकाळ जमिनीवर करण्यात येते. अशा जमिनींची ओलावा व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमताही कमी असते. अशा जमिनीत डाळिंब पिकासाठी योग्य व
फळ पिक सल्ला
संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी प्रथम मातीचे परीक्षण करून घ्यावे. त्यातून जमिनीची सुपीकता पातळी आणि जमीन डाळिंब पिकास योग्य आहे की नाही, हे समजते. त्याचबरोबर झाडांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे, हे समजून घेण्यासाठी पानांचे पृथःकरण करून घ्यावे. त्यासाठी फांदीमधून वरून आठव्या जोडीतील नुकतेच पक्व झालेली पाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावीत. त्यानुसार उपाययोजना ठरवणे सोपे जाते. ज्या ठिकाणी माती व पाने परीक्षणाची व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ठिकाणी झाडांच्या पानांवरून अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे आवश्यक ठरते. सातत्याच्या प्रयत्नातून सरावाने आणि अनुभवाने अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे शेतकऱ्यांना शक्य होते.

संत्रा/मोसंबी : आंबिया बहाराची फळे, झाडावर टिकण्यासाठी संत्रा/मोसंबी बागेमध्ये नियमित पाणी देणे सुरू
फळ पिक सल्ला
ठेवावे. उन्हाचे प्रमाण वाढत असून, तापमानामध्ये वाढ झाल्याने पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर ४ ते ५ दिवसांचे करावे. शक्य असेल तेथे बगीच्यात ड्रीपने पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची बचत होते व पाणी योग्यप्रकारे बगीच्यात देता येते. ठिबकसंच असल्यास संत्रा व मोसंबीच्या १ ते ४, ५ ते ७ आणि ८ ते १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना अनुक्रमे १७ ते ७४, १०२ ते १६६, १८७ ते २३५ लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड संध्याकाळी द्यावे. लिंबूच्या १ ते ४, ५ ते ७ आणि ८ ते १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना अनुक्रमे ११ ते ३५, ४२ ते ६१, ७३ ते १०८ लिटर पाणी प्रतिदिवस प्रतिझाड संध्याकाळी द्यावे. झाडाभोवती ओलावा टिकून राहण्यासाठी शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार यांचा ५ ते १० सेंमी थर देऊन झाडाभोवती आच्छादन करावे. यामुळे बाष्पीभवन कमी होते. आंबिया बहाराची फळगळ कमी होण्यास मदत होते.
ज्या ठिकाणी जूनमध्ये मृग बहार घ्यावयाचा आहे, तिथे बागीच्यांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याचा ताण द्यावा.

केळी : वातावरणातील तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. अशा अवस्थेत केळी पिकाला पाण्याचा ताण
फळ पिक सल्ला
पडू नये, यासाठी गरजेइतका पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. मृगबाग केळीला प्रतिझाड प्रतिदिवस २५ ते २८ लिटर तर कांदेबाग केळीला प्रतिझाड प्रतिदिवस २० ते २२ लिटर पाणी द्यावे. केळी बागेमध्ये ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी काळ्या रंगाच्या पॉलिइथिलीन कापडाचे आच्छादन करावे. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो; पाण्याची बचत होते. त्याशिवाय झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही खूप कमी राहते. एकूण उत्पादनात वाढ होते. ज्यांना पॉलिथीनचे आच्छादन टाकणे शक्य नाही त्यांनी केळीच्या दोन ओळीत केळीची वाळलेली पाने, उसाचे पाचट, गव्हाचा भूस्सा, सोयाबीनचा भूस्सा यांचे सेंद्रिय आच्छादन करावे.
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 
Post a Comment (0)
Previous Post Next Post