ऊस पिक सल्ला (krushik app)


ऊस पिक सल्ला

खोडवा ऊस :
खोडवा ऊस पिकामध्ये चाबूक काणी व गवताळ वाढ या रोगांचे प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो. यासाठी नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून काणी व गवताळ वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढावीत व जाळून नष्ट करावीत. काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वी बेटेनिर्मुलन झाले तर रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. प्रथम काणीयुक्त फोकारे प्लास्टिकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यावेत व नंतर बेटे काढावीत. सामुहिक पद्धतीने बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल. खोडवा पिकाची मशागतीची कामे वेळेवर करावीत. पाचटाचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात ऊस पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. गवताळ वाढ रोगाचा तुडतुड्यांमार्फत होणारा प्रसार रोखण्यासाठी, प्रादुर्भाव दिसून येताच डायमिथोएट १.५ मिली किंवा मॅलाथीऑन २ मिली किंवा अॅसिफेट १.३३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

पूर्वहंगामी ऊस : उसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्यांनी लहान फुटवे मरायला सुरवात होते. चांगल्या कांड्या तयार झालेले फुटवेच वाढत असतात. निसर्ग नियम आणि ऊस जातीच्या गुणधर्मानुसार एकरी फक्त ४० ते ४५ हजार ऊस शेवटपर्यंत टिकतात. यासाठी सुरवातीपासून ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी काही ठराविक सरीतील (८ ते १० ठिकाणी) एक मीटर अंतरातील कांडी सुटलेल्या व गळीतास तयार होणाऱ्या उसांची संख्या मोजावी. छोटे कोंब काढून घेण्यासाठी कांडी सुटलेल्या उसाच्या खालच्या / जमिनीलगतच्या दोन ते तीन कांड्यांचा वाळलेला पाला काढून छोटे कोंबही काढून घ्यावेत. कारण हे कोंब दोन ते तीन महिन्यांपर्यंत वाढत असतात. हे कोंब कांडी सुटलेल्या उसाच्या खाद्यामध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या अन्नपुरवठ्यावर परिणाम होऊन उसाच्या जाडीवर परिणाम होऊन एकसारखे व समान वजनाचे ऊस तयार होण्यासाठी अडथळा निर्माण करतात. एकरी उसाच्या जातीनुसार एकरी ४०,००० ते ४८,००० पक्व ऊस मिळण्यासाठी एका मीटरमध्ये नियंत्रित ऊस ठेवल्यास उसाचे सरासरी वजन वाढून २.५ ते ३.५ किलोचा ऊस तयार झाल्यास एकरी १०० टनांचे उद्दिष्ट सहज साध्य होईल.

सुरु ऊस : ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी. खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याच्या अधिक वापरामुळे जमिनी क्षारयुक्त बनतात व अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही निचरा होतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. पाणी देताना दारे धरून पाणी द्यावे. जमिनीच्या प्रकारानुसार व आवश्यकतेनुसार वाफ्यांचा आकार ठेवावा. पाण्याची बचतउत्पादन वाढ व जमिनीच्या सुपीकतेसाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरते.

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा     

krushik app


Post a Comment (0)
Previous Post Next Post